लातूर (प्रतिनिधी) : माजी केंद्रीय गृहमंत्री तथा राजकीय क्षेत्रातील एक सुसंस्कृत, अभ्यासू व्यक्तिमत्त्व लातूरचे सुपुत्र शिवराज पाटील चाकूरकर यांचे शुक्रवार, दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ६.३० वाजता येथील देवधर या त्यांच्या निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने एक अनुभवी, सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न राजकारणी गमावला असून, कॉंग्रेस पक्षाची अपरिमित हानी झाली आहे.
लातूर जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक जडणघडणीत माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे मोलाचे योगदान आहे. लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास खरोखरच वाखानण्याजोगा आणि आदर्शवादी राहिलेला आहे. केंद्रीय राजकारणात ३ दशकांपेक्षा अधिक काळ त्यांनी लातूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. त्यांची संपूर्ण कारकीर्द लातूर जिल्ह्याला देशपातळीवर सन्मान मिळवून देणारी होती.
इतका प्रदीर्घ काळ राजकारणाच्या केंद्रस्थानी राहूनही अजातशत्रू, सुसंस्कृत राजकारणी म्हणून त्यांची कायम ओखळ राहिलेली आहे. त्यांच्या निधनामुळे देशाच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले आहे.

