नर्सी नामदेव (हिंगोली) : गत दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरण बदलले आहे. दोन दिवसांपासून रोज सायंकाळ व रात्रीच्यावेळी वादळवारे व अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह गारांही पडत आहेत. दरम्यान, जोराच्या वादळामुळे कडती परिसरातील एका विहिरीत जवळपास चाळीस बगळ्यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला.
बुधवारी सायंकाळी नर्सीसह परिसरातील कडती, हनवतखेडा, देऊळगाव, गिलोरी, जांभरुण आदी ठिकाणी जोरदार वादळीवारे झाले. या वादळीवा-याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले, तर काही ठिकाणी मोठमोठी झाडे रस्त्यांवर उन्मळून पडली. तसेच विजेचे खांबही रस्त्यावर कोसळले. वादळीवा-यामध्ये कडती परिसरात झाडावर बसलेल्या बगळ्यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. वा-याचा वेग प्रचंड प्रमाणात असल्याने व सायंकाळची वेळ असल्याने वादळीवा-याचा फटका बगळ्यांना सहन झाला नाही. त्यामुळे ते झाडाजवळ असलेल्या विहिरीत पडले.
दरम्यान, प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने ११, १२ व १३ एप्रिल रोजी वादळीवा-यासह अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ११ व १२ रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यांत, १३ एप्रिल रोजी नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, ंिहगोली व परभणी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळीवारा, मेघगर्जना होईल. तसेच विजांचा कडकडाट होऊन वारेही सुटेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.