36.1 C
Latur
Sunday, April 27, 2025
Homeमहाराष्ट्रदक्षिण एक्स्प्रेसमध्ये चौघांनी केली प्रवाशाची हत्या

दक्षिण एक्स्प्रेसमध्ये चौघांनी केली प्रवाशाची हत्या

नागपूर : तेलंगणातून गावाकडे परतणा-या एका मजुराला चार लुटारूंनी धावत्या रेल्वेत बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. सिकंदराबाद-लखमीपूर दक्षिण एक्स्प्रेसमध्ये (गाडी क्रमांक १२७२१) गुरुवारी पहाटे ही घटना घडली. या प्रकरणी रेल्वेपोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

शशांक रामसिंग राज (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशातील राजापूर, कैमहारा (खिरी) येथे राहत होता. शशांक धान कापणीचे काम करीत होता. गावात रोजगार नसल्याने तो काही दिवसांपूर्वी तेलंगणात धान कापणीच्या कामासाठी गेला होता. काम आटोपल्यानंतर मिळालेले पैसे गाठीशी बांधून तो कपिल कुमार नामक एका मित्रासह गावाकडे जाण्यासाठी दक्षिण एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात बसला. त्याच डब्यात शौचालयाजवळ काही लुटारू बसले होते. शशांक आणि त्याचा मित्र झोपेत असताना एका लुटारूने शशांकच्या शर्टच्या खिशातून १७०० रुपये काढून घेतले.

त्यानंतर त्याच्या मित्राच्या खिशातून मोबाइल काढून घेतला. त्याचवेळी मित्राला जाग आल्याने त्याने लुटारूंकडून त्याचा मोबाइल परत घेतला आणि शशांकला जागवले. बाजूला बसलेले आरोपी चोर-लुटारू असल्याचे त्याला सांगितले.

आधी उलटी झाली आणि नंतर प्राण सोडले
शशांकने आपले खिसे तपासले असता १७०० रुपये चोरीला गेल्याचे त्याच्या लक्षात आले. परिणामी शशांकने लुटारूंना रक्कम परत मागितली. त्यावरून वाद झाल्यानंतर चार लुटारूंनी शशांकला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी पहाटेचे तीन ते साडेतीन वाजले होते. जोरदार मार बसल्यामुळे सकाळी ६ च्या शशांकला रक्ताची उलटी झाली. यावेळी त्याच्या मित्राने त्याला पाणी वगैरे पाजून त्याला शांत केले. ६:३० च्या सुमारास शशांकचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर कपिलकुमारने आरडाओरड करून सहप्रवाशांना ही बाब सांगितली. त्यानंतर आरपीएफला कळविण्यात आले. आरपीएफने रेल्वे कंट्रोलला माहिती दिली तसेच संशयित आरोपींना पकडून ठेवले. सकाळी १०:३५ ला गाडी नागपूर स्थानकावर पोहोचताच रेल्वे पोलिसांनी शशांकचा मृतदेह गाडीतून उतरवून रुग्णालयात पाठविण्यात आला.

चारही आरोपी हैदराबादचे
शशांकच्या मित्राने दिलेल्या माहितीवरून रेल्वेचे पोलिस निरीक्षक गौरव गावंडे यांनी मो. फय्याज मो. हाशिमुद्दीन (वय १९), सय्यद रागिर सय्यद जिमल (वय १८), एम. शाम. कोटेश्वर राव (वय २१) आणि मो. अमान मो. अकबर (वय १९) यांना ताब्यात घेतले. हे सर्व हैदराबादचे रहिवासी आहेत. ते काय करतात, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, त्याची चौकशी केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR