लातूर : छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अॅड. विजयकुमार घाडगे पाटील यांना झालेल्या मारहाण प्रकरणात मंगळवार दि. २२ जुलै रोजी विवेकानंद चौक ठाण्याच्या पोलिसांनी आणखी ५ जणांना अटक केली. अटक केलेल्या एकूण आरोपींची संख्या ७ झाली आहे. अद्याप ४ जणांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
पोलिसांनी सांगितले, राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हीडीओ समोर आल्यानंतर रविवारी लातुरात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी जाऊन छावा संघटनेच्या पदाधिका-यांनी निषेध नोंदवला. यावेळी त्यांनी तटकरे यांच्यासमोर पत्ते टाकले. या प्रकाराने संतप्त झालेल्या सूरज चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे अॅड. विजयकुमार घाडगे-पाटील व कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत विवेकानंद चौक ठाण्यात सोमवारी पहाटे सूरज चव्हाण यांच्यासह एकूण ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, यातील लाला सुरवसे आणि अभिजित सगरे पाटील यांना पोलिसांनी सोमवारी अटक केली. तर, अमित क्षीरसागर, राजू बरगे, सिद्दीकी मुल्ला, शेख आणि वसिम मुल्ला यांना मंगळवारी अटक केली आहे.
अन्य ४ जणांचा शोध सुरू : पो. नि. पाटील
छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्या प्रकरणात एकूण ११ जणांविरोधात गुन्हा दाखल असून, आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित ४ जणांचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली.