रांची : उत्तराखंड येथील हल्दवानी शहरात गुरुवारी हिंसाचार झाला. अवैधरित्या बांधण्यात आलेले मशिद आणि मदरसे तोडल्यानंतर येथील परिस्थिती हाताबाहेर गेली होती. बुलडोझर कारवाई करण्यात आल्याने पोलिस प्रशासनावर जोरदार दगडफेक करण्यात आली. तसचे यावेळी अनेक वाहने देखील पेटवण्यात आल्याचा प्रकार समोर आला.
या घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत, यामध्ये काही महिला पोलीस कर्मचा-यांचा देखील समावेश आहे.
हायकोर्टाने दिलेल्या आदेशानंतर दुपारी दीड-दोन वाजता एसडीएम आणि महापालिका अधिकारी यांच्यासह पोलिसांचे पथक बेकायदेशीर मदरसे जमीनदोस्त करण्यासाठी गेले होते. अधिका-यांनी अतिक्रमण हटवल्यानंतर लगेचच काही लोकांनी दगडफेक सुरू केली.
पोलिसांनी जमावाला शांत करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र यामुळे जमाव अधिक आक्रमक झाला. दगडफेक करणा-यांवर पोलीसांनी प्रत्युत्तरादाखल लाठीमार केला.
हल्दवानीच्या बनभूलपुरा येथे झालेल्या हिंसाचारानंतर इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून त्यात आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला असून १००हून अधिक पोलीस जखमी झाले आहेत. प्रशासनाने सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती नैनिताल जिल्हा प्रशासनाने दिली.