बीड : जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह सरकारवर टीका करणारे बडतर्फ पोलिस अधिकारी रणजित कासले यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात कासलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलाच्या शैक्षणिक शुल्कासाठी पैशांची गरज आहे म्हणून रणजित कासले यांनी सुदर्शन काळे यांच्याकडून रुपये १० लाख घेतले होते. त्यातील अडीच लाख रुपये परत केले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. परळी विधानसभा निवडणुकीच्या काळात स्ट्रॉंग रूमपासून दूर राहण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या माणसाने १० लाख रुपये दिल्याचा दावा रणजित कासले यांनी केला होता. परंतु त्यांचा हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे.
रणजित कासले सध्या छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. रणजित कासले यांना बीडच्या कारागृहात जीवाला धोका असल्याने छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात आले असल्याचे समजते. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड, सुदर्शन घुले व इतर आरोपी हे बीड कारागृहात आहेत.
रणजित कासले यांनी या आरोपींवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हर्सूल कारागृहात हलवण्यात आले आहे. अॅट्रॉसिटी प्रकरणात सध्या रणजित कासले न्यायालयीन कोठडीत आहेत. रणजित कासले यांनी धनंजय मुंडे यांच्यावर देखील त्यांनी गंभीर आरोप केले होते. याचसोबत महाराष्ट्र सरकारवर देखील आरोप केले होते. सध्या रणजित कासले यांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाणे, अंबाजोगाई शहर पोलिस ठाणे आणि परळी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.