संभाजीनगर : विशेष प्रतिनिधी
आम्ही आचारसंहितेचे काम करत आहोत, तपासणी करतोय, असे सांगत आलिशान कारमधून आलेल्या अज्ञातांकडून शासकीय पथकाच्या नावाखाली धाकदपटशा सुरू आहे. मंगळवारी रात्री शरणापूर फाट्याजवळील एका बारमध्ये अशाच एका कारमधील दोघे वाद घालताना सीसीटीव्ही फुटेजध्ये कैद झाल्यानंतर ही घटना समोर आली.
शरणापूर फाट्याजवळ एका हॉटेल व्यावसायिकाने रात्री बार बंद केला होता. कामगार आवराआवर करत होते. तेव्हा १२:३० वाजता पांढ-या रंगाची गाडी आली. पोलिस वाहनासारखा सायरन वाजवून हॉटेल चालकाला बाहेर बोलावले. गाडीतील दोघांपैकी एकाने त्यांना कारमध्ये दारू देण्याचे आदेश दिले. चालकाने बार बंद केल्याचे सांगितले. तेव्हा, ‘आम्ही निवडणुकीचे काम करतोय, एसीबीचे कर्मचारी आहोत’, असे म्हणत दंडेलशाही केली. बारचालकाने दारू देण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर ‘उद्या तुझे हॉटेल बंद करतो’, अशी धमकी देत ते दौलताबादच्या दिशेने रवाना झाले.
पांढ-या रंगाच्या कारला असलेल्या एमएच २० फॅन्सी नंबर प्लेटवर पहिला आकडा सूक्ष्म स्वरूपात, तर खाली मोठ्या आकारात ३१३ क्रमांक होता. समोर पोलिस, अशी पाटी लावून पोलिसांच्या वाहनासारखा सायरन देखील ते वाजवत फिरत होते.