हैदराबाद : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जनतेला दिलेल्या सहा आश्वासनांपैकी काँग्रेसने दोन आश्वासनांची अंमलबजावणी आजपासून सुरू केली. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्ताने रेवंत रेड्डी सरकारने महिलांसाठी मोफत बस सेवा योजना सुरू केली. तसेच आरोग्यश्री आरोग्य विमा कवचची मर्यादा दहा लाखांपर्यंत वाढविली.
मोफत बस योजना (महालक्ष्मी) नुसार महिलांना आता प्रदेशात राज्य परिवहन महामंडळाच्या एक्स्प्रेस आणि साध्या बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. याशिवाय दहा लाखांपर्यंतच्या मोफत उपचाराशी संबंधित आरोग्य श्री योजनेचे देखील अनावरण करण्यात आले.
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी यावेळी जागतिक अजिंक्यपद विजेता, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता, मुष्टियोद्धा निखत जरीनला पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीसाठी दोन कोटी रुपयांचा धनादेश दिला. अन्य हमी योजना शंभर दिवसांत लागू केल्या जातील, असे रेड्डी म्हणाले.
तेलंगणात लोकशाही मार्गाने सरकार चालविण्यात येईल आणि कल्याणकारी राज्य म्हणून तेलंगणा नावारूपास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, कॅबिनेटच्या बैठकीत राज्यातील विजेच्या स्थितीवर चर्चा करण्यात आली. तसेच अधिका-यांना कृषि क्षेत्रासह सर्व क्षेत्रांना चोवीस तास अखंड वीजपुरवठा करण्यासंदर्भातील निर्देश दिले.
ओवेसींना भाजपचा विरोध
भाजप आमदारांनी एमआयएमचे आमदार अकबरूद्दीन ओवेसी यांना हंगामी अध्यक्ष म्हणून निवडण्यास विरोध केला. हैदराबादेतील विधानसभा परिसरातील गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यासाठी दाखल झालेल्या भाजप आमदारांना पोलिसांनी रोखले. भाजपचे आमदार विधानसभेच्या दोन क्रमांकाच्या प्रवेशद्वाराजवळ आले असता पोलिसांनी भाजप आमदारांना हुसकावून लावले.
दरम्यान, तेलंगणाच्या राज्यपाल तमिळसाई सौंदराजन यांच्या परवानगीनंतर आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. त्यानंतर ओवेसी यांनी नवनियुक्त आमदारांना शपथ दिली. दुसरीकडे भाजपने ओवेसी यांच्या उपस्थितीत आमदारकीची शपथ घेतली नाही आणि या कार्यक्रमावर बहिष्कार घातला.