22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रअर्थमंत्र्यांच्या वक्तव्यावरून राज्य गहाण ठेवल्याचे सिध्द ; पटोलेंचा हल्लाबोल

अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यावरून राज्य गहाण ठेवल्याचे सिध्द ; पटोलेंचा हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी
मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी बैठकीत आपल्या विभागाला २५/१५ योजनेसाठी अतिरिक्त निधीची मागणी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. यावर ‘पैसे कुठून आणू, आता काय जमीन विकायची का?’ असा संतप्त सवाल अजित पवार यांनी महाजन यांना विचारल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावरून अजित पवार यांच्यावर टीका केली.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या सत्ताधारी पक्षातील नेते आणि आमदार आपल्याला जास्तीत जास्त निधी कसा मिळेल, या प्रयत्नात आहेत; मात्र यावरून आता सत्ताधारी पक्षांमधील मतभेद समोर येत आहेत.

अजित पवार यांच्या वक्तव्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, वित्तमंत्री अजित पवार म्हणतात पैसे आणू कुठून, या वक्तव्यावरून राज्य गहाण ठेवले हे सिद्ध होते, असा टोला पटोले यांनी लगावला. पैसे आणायचे असल्यास राज्यातील जमिनी विकाव्या लागतील, अशा कॅबिनेट बैठकीत चर्चा होतात. राज्य या लोकांनी गहाण टाकले आहे, हे आम्ही आरोप करत होतो पण आता यावरून वस्तुस्थिती दिसत आहे. विकासाच्या नावाने पैसे घेतले, विकास या लोकांचा झाला आहे. राज्यात भ्रष्टाचाराचे प्रमाण किती असेल हे लक्षात येते. या सरकारमध्ये कोण सर्वांत जास्त पैसे खातो यावर स्पर्धा लागली आहे, असा आरोपही नाना पटोले यांनी केला.

विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम सुरू
माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपावर बोलताना पटोले म्हणाले, देशात मोदी सरकार आल्यापासून राजकारणाची स्थिती बदलली, जे सरकार विरोधात असेल त्यांना जेलमध्ये टाकण्याचे काम सरकारने केले. ईडीचा वापर केला, पण सत्तेत सोबत गेले त्यांना क्लीन चिट मिळाली. त्यामुळे अनिल देशमुख बोलले हे खरे असेल. एकनाथ शिंदे आणि टीम हे ईडीच्या नजरेत होती, वायकर सांगतात मी नाइलाजने शिंदे गटात आलो यावरून समजते, असेही पटोले म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांवर टीका
नाना पटोले म्हणाले, राज्याचे गृहमंत्री तुम्ही आहात. तुम्हाला कोणी थांबवलं, वस्तुस्थिती मांडली पाहिजे. तुम्ही व्हीडीओ दाखवा. ड्रगमाफियाला जेलमध्ये फाईव्ह स्टार व्यवस्था आहे, गृहमंत्रिपदाचा उपयोग विरोधकांना धमक्या देण्यासाठी करत आहेत, असेही पटोले म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR