सोलापूर : विविध फळभाज्या स्वस्त झाल्याने आहारात त्याचे प्रमाण वाढले आहे. मध्यंतरी पालेभाज्या आणि कडधान्याचा होणारा जास्त वापर आता कमी झाला आहे. रोज वेगवेगळ्या फळ भाज्यांचा आहारात समावेश होतोय. दररोज नवीन भाजीचा नसल्याचे गृहिणींचे म्हणणे आहे. बाजारात फळभाज्यांसह मटारची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी १२० रुपये प्रतिकिलो असलेले मटार आता फक्त ५० ते ६० रुपयांना विक्री होत आहेत.
बाजारात दाखल झालेल्या मालाच्या तुलनेत मागणी नसल्याने मेथी, पालक, फ्लॉवर, वालाच्या शेंगा, कोबी, वांगे, भेंडी, दोडके, टमाटे आदी भाज्यांचे भाव कमी झाले आहेत. टोमॅटोच्या नवीन लागवडीचे उत्पादन सुरू झाल्याने टोमॅटोची आवक वाढू लागली आहे. तर, मागणी आणि पुरवठा यामुळे उर्वरित फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याचे विक्रेत्याने सांगितले.
६० रुपये प्रति किलो मटारचा भाव सध्या मार्केटमध्ये आहे. भाज्यांची आवक वाढली आहे. भाव आवाक्यात आल्याने सर्व भाज्यांचा आहारात वापर होत आहे. हिवाळ्यात पालेभाज्या खाण्याकडे जास्त कल असला तरी स्वस्त झालेल्या फळभाज्यांचे प्रमाणही वाढले आहे. मागील काही दिवसांपासून भाज्यांचे भाव कमी झाल्यामुळे नागरिकांची भाजी बाजारात गर्दी दिसत आहे. सर्व प्रकारच्या भाज्या उपलब्ध असल्याने महिलांसमोरचे रोजच्या भाजीचा प्रश्न सुटला आहे. विशेषत : गाजर आणि वटाणा यांची ग्राहकांकडून मागणी वाढलेली दिसून येते. गाजर आणि वटाणा हे शरीरासाठी उष्ण आणि पौष्टिक असल्याने हिवाळा ऋतूमध्ये ग्राहकांचा त्यांच्या खरेदीकडे जास्त दिसून येत आहे.