सोलापूर : तेलंगणाच्या सरकारच्या वतीने सोलापुरात तेलंगणा तेलुगू भवन उभारण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याचा अध्यादेश लवकरच काढू, पद्मशाली समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या हातात हा अध्यादेश देऊ, असे आश्वासन तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सोलापूरमधील तेलुगू भाषिकांना दिले.
खासदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी नुकतीच हैदराबादमध्ये मुख्यमंत्री रेड्डी यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री रेड्डी सोलापुरात प्रचाराला आले होते. या वेळी तेलुगू भवनसाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. या घोषणेची आठवण पद्मशाली संस्थेच्या सदस्यांनी करून दिली.
हा निधी लवकरच उपलब्ध करुन देऊ आणि त्यासंदर्भातील आदेश पद्मशाली पदाधिकाऱ्यांच्या हातात देउ, असे रेड्डी यांनी सांगितले. यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे जनार्दन कारमपुरी, नरसप्पा ईप्पाकायल, रामचंद्र जन्नू, सत्यनारायण गड्डुम, महांकाली येलदी, संतोष सोमा, उमेश मामड्याल, तिरुपती परकीपंडला, अंबादास बिंगी, रमेश कैरमकोंडा आदी उपस्थित होते.