झिंटन : लिबियाचे माजी हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी याचा मुलगा आणि एकेकाळचा त्यांचा उत्तराधिकारी सैफ अल-इस्लाम गडाफी याची मंगळवारी हत्या करण्यात आली. लिबियातील झिंटन येथील त्याच्या राहत्या घरी चार अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी घुसून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात सैफ अल-इस्लामचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी प्रथम घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे निकामी केले. त्यानंतर कमांडो स्टाईलने घरात प्रवेश करून त्यांनी सैफ अल-इस्लामवर थेट गोळीबार केला. हल्ल्यानंतर हे बंदूकधारी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेची पुष्टी सैफच्या राजकीय कार्यालयाने आणि त्यांच्या वकिलांनी केली आहे. मात्र, या हत्येमागे कोणाचा हात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कोण होता सैफ अल-इस्लाम गद्दाफी?
५३ वर्षीय सैफ हा मुअम्मर गद्दाफी यांचा दुसरा मुलगा होता. २०११ च्या क्रांतीनंतर तो लिबियातील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक मानला जात असे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतलेला सैफ हा पाश्चात्य देशांशी जवळीक असलेला नेता म्हणून ओळखला जायचा. २०११ मध्ये त्याच्या वडिलांच्या हत्येनंतर तो अनेक वर्षे विजनवासात होता. २०१५ मध्ये त्याला त्रिपोलीच्या न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती, पण नंतर त्याची सुटका झाली होती.
लिबियाच्या राजकारणात खळबळ
२०२१ मध्ये त्याने लिबियाच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती, ज्यामुळे लिबियातील राजकीय समीकरणे बदलली होती. त्याच्या हत्येमुळे लिबियातील शांतता प्रक्रियेवर आणि आगामी निवडणुकांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लिबियाच्या ऍटर्नी जनरल कार्यालयाने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून दोषींना लवकरच अटक केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

