मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाच्या खांदेपालटावर सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे नवे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड हे असणार आहेत. वादग्रस्त व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना अखेर पदावरुन हटवले.
राज्य सरकारच्या या महत्वाकांक्षी मंडळाच्या प्रमुखपदाची सूत्रे आता राधेश्याम मोपलवार यांच्याकडून अनिल गायकवाड यांच्या हाती सोपवण्यात आली आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उध्दव ठाकरे मुख्यंमंत्रीपदाच्या काळात मोपलवार यांना कायम स्थान मिळत होते. मंडळांचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार यांनी २०१८ मधील निवृत्तीनंतरही रेकॉर्ड ब्रेक सातवेळा आपली कालमर्यादा वाढवून घेतली होती.