नवी दिल्ली : गौतम गंभीरने टीम इंडियाचे प्रशिक्षक पद हाती घेताच आपल्या पसंतीचा संघ निवडला आहे. हार्दिकला बाजुला सारत सूर्यकुमारला त्याने कप्तान केला. यापेक्षा लक्षवेधक बाब म्हणजे गंभीरने केकेआरच्या टीमममधील प्लेअरना संघात घेतले आहे. गंभीरच्या काही निर्णयांमुळे मोठा वाद ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या २७ जुलैपासून सुरु होणा-या टी २० आणि वन डे सिरीजसाठी काल रात्री टीम इंडियाची घोषणा झाली. वनडेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली उपलब्ध असणार आहेत. हे जरी असले तरी गंभीरने केकेआरच्या प्लेअरना झुकते माप दिले आहे. हार्दिक पांड्याच्या आयुष्यात वादळ आले आहे. त्याचे नेतृत्वगुण आणि अन्य बाबींमुळे हार्दिकला कोणत्याही प्रकारच्या नेतृत्वापासून बाजुला करण्यात आले आहे. हार्दिक कप्तान होणार अशा चर्चा होत्या परंतू त्याला साधे उप कप्तानही बनविण्यात आलेले नाहीय. टी २० वर्ल्डकपला पांड्या उप कप्तान होता, त्याच्याजागी शुबमन गिलला कप्तान करण्यात आले आहे.
पांड्या दुखापतग्रस्त होण्यापूर्वी २०२३ च्या वर्ल्डकपमध्ये उप कप्तान होता. आता गिलला दोन्ही स्वरुपासाठी उप कप्तान नियुक्त केल्यामागे गंभीरचा आणि बीसीसीआयचा मोठा प्लॅन आहे. टीम इंडियाचा भविष्यातील कप्तान म्हणून गिलला तयार करण्यात येणार आहे. सूर्याचे वय ३३ आणि रोहित ३७ वर्षांचे असल्याने टीम इंडियाला लवकरच नव्या खमक्या कप्तानाची गरज भासणार आहे. म्हणूनच ज्या खेळाडूला टी २० वर्ल्डकपमध्ये राखीव खेळाडू म्हणून पण घेतले गेले नाही त्याला थेट उप कप्तान बनविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गंभीरची नजर आता २०२७ च्या वर्ल्डकपवर आहे. भविष्यातील कप्तान म्हणून गिलकडे तो पाहत आहे.
दुसरा धक्कादायक निर्णय म्हणजे टी २० वर्ल्डकपमध्ये चांगली गोलंदाजी केलेल्या कुलदीप यादवला संघातून वगळण्यात आले आहे. त्याला वनडे टीममध्ये घेण्यात आले आहे. झिम्बाब्बे दौ-यात ४६ चेंडूत शतक ठोकणा-या अभिषेक शर्माला तिस-या नंबरवर जागा नसल्याने वगळण्यात आले आहे. तिसरा धक्कादायक निर्णय म्हणजे चेन्नई सुपरंिकग्जचा कप्तान ऋतुराज गायकवाड याला देखील बाजुला करण्यात आले आहे. रियान परागला दोन्ही टीममध्ये घेण्यात आले आहे. चौथा धक्कादायक निर्णय म्हणजे ज्या श्रेयस अय्यरने रणजी खेळण्यास नकार दिलेला त्या अय्यरला गंभीरने तो केकेआरचा प्लेअर असल्याने झुकते माप दिले आहे. बीसीसीआयने तर त्याचा केंद्रीय करारही रद्द केला होता. याचबरोबर वेगवान गोलंदाज हर्षित राणाला वन डे आणि रिंकू सिंहला टी २० साठी संघात घेतले आहे.