मोहोळ / प्रतिनिधी
डी.बी. शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या गोपनीय बातमीदाराने मोहोळ पोलीस प्रशासनास दिलेल्या खबरीनंतर सतर्क झालेल्या मोहोळ पोलीस प्रशासनाच्या टीमने मोहोळ-कुरुल रस्त्यावरील छावा ढाब्यानजिक लावलेल्या नाकाबंदी दरम्यान कामतीकडून कुरुल रोड मार्गे मोहोळच्या दिशेने निघालेल्या झायलो कारला थांबवले असता त्या कारमधील तब्बल ८५ किलो वजनाचा सहा लाख ८८ हजार रुपये किमतीचा गांजा मोहोळ पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई रात्री पावणे अकराच्या सुमारास मोहोळ – कुरुल महामार्गावरील छावा ढाब्याजवळ घडली. या कारवाईमध्ये नऊ लाख रुपये किमतीच्या झायलो कारसह एकूण पंधरा लाख ८८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मोहोळचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोहोळ पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाचे कर्मचारी सिद्धनाथ मोरे यांच्या खास गुप्त बातमीदाराने मोहोळ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक आतकरे व डी.बी. पथकाचे दयानंद हेंबाडे यांना समक्ष भेटून कामतीकडून मोहोळकडे गांजाची गाडी येत असल्याची पक्की खबर दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक राऊत यांनी वरिष्ठ पोलीस प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना घेत तात्काळ सदर दिशेने पोलीस ठाण्याचे पथक पंचांसमक्ष पाठवले.
या पथकामध्ये सपोनि आतकरे, डी.बी. पथकाचे हेंबाडे, पोलीस कर्मचारी पवार, ढवळे, मोरे, जगताप, सावंत हे कर्मचारी होते. छावा ढाब्यानजीक हे पथक थांबले असता रात्री पावणे अकराच्या सुमारास कामतीकडून झायलो गाडी (क्र. एमएच १४ बीए ४५३८) येताना दिसली. सदर गाडी थांबवून त्याला अटकाव करत सदर इसमांना त्यांचे नाव पोलिसांनी विचारले असता यशवंत सौदागर जगताप (वय ३२, रा. सोहाळे, ता. मोहोळ, जि.सोलापूर), मानवा बेबरता (वय २९), सपानकुमार बेबरता (वय २६), जोशना सपनकुमार बेबरता(वय २५, रा. सर्व रा.टाडीगुंडा, ता. आर उयदगीर, जि. गजपती, राज्य- ओरिसा) असे सांगितले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर सदरचे वाहन हे यशवंत जगताप याचे असल्याचे गाडीतील इसमांनी सांगितले.
यावेळी गाडीतील झडती दरम्यान विविध सुटकेसमध्ये गांजा पॅक करून वाहतूक होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी पॉकट उघडून सदरचे वनस्पती हे गांजाच असल्याचे दिसून आले.मोहोळ पोलिसांनी एनडीपीएस अॅक्ट १९८५ मधील कलम ८ २० २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दयानंद दादासाहेब हेंबाडे यांनी फिर्याद दिली असून, तपास पोलीस निरीक्षक राऊत हे करीत आहेत.