कल्याण : कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात केलेल्या गोळीबार प्रकरणातील आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गायकवाड यांच्या मुलास धक्काबुक्की व शिवीगाळ होत असतानाचा हा व्हिडीओ आहे.
माझ्या मुलाला पोलिस ठाण्यात धक्काबुक्की व शिवीगाळ झाल्याने मी गोळीबार केला, असे आमदार गायकवाड यांनी म्हटले होते. मी केलेल्या गोळीबाराचा सीसीटीव्ही फूटेजमधील व्हिडीओ व्हायरल झाला. मात्र माझ्या मुलाला झालेल्या धक्काबुक्कीचा व्हिडीओ का समोर आणला जात नाही, असा प्रश्न गायकवाड यांनी उपस्थित केला होता. यानंतर वैभव गायकवाड यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ काही वेळांतच व्हायरल झाला.
मात्र पोलिस ठाण्यातील सीसीटीव्हीचे फूटेज व्हायरल झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पोलिस ठाण्यात पोलिसांना जाब विचारण्यासाठी आलेल्या आमदार गायकवाड यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या दालनात बसलेल्या शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड, राहुल पाटील यांच्यावर बेछूट गोळीबार केला.
यात महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले. माझ्या मुलाला धक्काबुक्की केल्यामुळे मी बचावासाठी गोळीबार केल्याची कबुली आमदार गायकवाड यांनी दूरध्वनीवरून दिली होती. मात्र या घटनेचा व्हिडीओ समोर आला नव्हता. पोलिस ठाण्याबाहेरील व्हिडीओ संरक्षित करण्याची मागणी त्यांनी शनिवारी न्यायालयात केली होती. यानंतर काही तासांतच पोलिस ठाण्याबाहेरील व्हिडीओदेखील समोर आला व तो लगेचच व्हायरल झाला आहे.