नवी दिल्ली : डोंगराळ राज्यांमधील बर्फवृष्टी आणि हिमालयीन प्रदेशात वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झाल्यामुळे मैदानी प्रदेशात थंडी वाढली आहे. मध्य प्रदेशात पारा ३ अंशाखाली आला आहे. हवामान विभागाच्या मते, वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम १३ डिसेंबरपासून दिसू लागेल, ज्यामुळे तापमान आणखी वेगाने खाली येईल.
महाराष्ट्रात विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीची लाट अधिक तीव्र होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे पुढील काही दिवस राज्यात गारठा आणखी वाढण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्येही पारा घसरू लागला आहे. राज्यातील २० हून अधिक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान १० अंशाच्या खाली नोंदवले गेले. फतेहपूर सर्वात थंड राहिले, येथे तापमान ३.७ अंशावर नोंदवले गेले.
डोंगराळ राज्य उत्तराखंडमध्ये धबधबे गोठू लागले आहेत. चमोली-पिथौरागढमध्ये पाइपलाइनमधील पाणी गोठले. केदारनाथमध्ये तापमान -१५, तर बद्रीनाथमध्ये -१३ अंशा पर्यंत खाली गेले. इकडे हरियाणातील ४ जिल्ह्यांमध्ये तापमान ७ अंशाच्या खाली नोंदवले गेले आहे. १२ जिल्हे असे होते जिथे किमान तापमान १० अंशपेक्षा कमी होते. हवामान विभागाच्या मते, १२ डिसेंबरपासून राज्यात थंडी वाढेल.

