वाशिम : प्रतिनिधी
सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत. सर्वसामान्यांना महागाईमुळे अक्षरश: झळा सोसाव्या लागत आहेत. त्यातच लसणाच्या दराने नवा विक्रम केला आहे. त्याची दिवसागणिक दरवाढ सुरूच आहे. सध्या बाजारात लसणाचा भाव सरासरी ५०० रुपये किलोवर पोहोचला आहे. त्यामुळे एक किलो लसूण घेण्यासाठी सर्वात मोठी नोट खर्ची पडत असल्याने सामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे.
सध्या बाजारात लसूणचे भाव पुन्हा एकदा गगनाला भिडलेले पाहायला मिळाले. सध्या लसणाचे मोठे उत्पादन घेणा-या मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरातमध्ये दमदार पाऊस झाल्याने पिके वाया गेली. त्याचा परिणाम थेट आयातीवर झाल्याचे पाहिला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून लसणाचे भाव अफाट वाढले आहेत. आजघडीला प्रतिकिलो लसणासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. त्यात विशेष म्हणजे या भावात हलक्या दर्जाचा लसूण मिळतो. अजून चांगल्या प्रतीचा लसणाचा भाव जास्त आहे. यामुळे सर्वसाधारण कुटुंबीयांचे काही प्रमाणात बजेट बिघडले आहे.
देशी वाण असलेला औषधी म्हणून मानला जाणारा लसूण दुर्मिळ झाला आहे. याला पर्याय म्हणून राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेश, इंदूर सारख्या राज्यातून लसणाची आवक बाजारात दिसून येत आहे. गेल्या वर्षी शेतकरीवर्गाने लसूण पिकाकडे पाठ फिरवली. त्यातच मोठा पाऊस होऊन पिकांचे नुकसान झाल्याने लसणाची कमतरता भासल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.
महागाईचा हा दर १५ टक्के वाढला
दिवाळी सण जवळ आला असताना किराणा मालासह खाद्यतेल व डाळींच्याकिंमतीत वाढ झाली आहे. महागाईचा हा दर १५ टक्के वाढला आहे. नवरात्रीनंतर दिवाळीची लगबग सुरू होते. या सणासाठी फराळाला अधिक महत्व असते. त्याअनुषंगाने शेंगदाणे, चणाडाळ, पोहे, मुरमुरे, भडंग पोहे, डाळवे याला जास्त मागणी असते. तसेच गोड फराळासाठी आवश्यक रवा व साखरही महागली आहे.