पुणे – उत्तर भारतातील थंडीचे लोण हळूहळू महाराष्ट्रात पसरत आहे. राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा प्रथमच यंदाच्या हंगामातील नीचांकी पातळीवर आल्याने महाराष्ट्र गारठला आहे. शनिवारी (ता. १६) नगर जिल्ह्यातील जेऊर येथे हंगामातील नीचांकी १०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
उत्तर भारतातील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पसरली आहे. पंजाब, हरियाणा, चंदिगढ, दिल्लीच्या अनेक भागांत किमान तापमान ४ ते ८ अंशांच्या दरम्यान आहे. तर पंजाबमधील अमृतसर आणि लुधियाना येथे देशातील नीचांकी ४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा १३ अंशांच्या खाली घसरला आहे. गारठा वाढू लागल्याने जेऊर पाठोपाठ परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ११ अंश सेल्सिअस, यवतमाळ येथे ११.५ अंश, तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ११.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.