मुंबई : इराण विरुद्ध इस्त्रायल-अमेरिका युद्धामुळे राज्यात स्वयंपाकाच्या गॅसचा भयंकर तुटवडा निर्माण झाला आहे. बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्यामुळे नागरिकांच्या गॅस एजन्सीपुढे लांबलचक रांगा लागल्या आहेत. यामुळे सरकारने एका परिपत्रकाद्वारे जिल्हाधिका-यांना सुचना देण्यात आल्या आहेत.
सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकारने स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्याला प्राधान्य दिले आहे. या प्रकरणी व्यावसायिक गॅसच्या पुरवठयावर अंशत: निर्बंध लादण्यात आलेत. परिणामी, गॅसवर अवलंबून असणा-या राज्यातील उद्योग, व्यवसायांना जबर फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एका परिपत्रकाद्वारे गॅस वितरणाविषयी एक नियमावली जारी केली आहे. त्यानुसार, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक सेवांना १०० टक्के गॅस पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आलेत. तर इतर संस्था व विभागांना ७० ते ५० टक्के गॅस पुरवठा करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
राज्याचे सहसचिव अशोक आत्राम यांनी या परिपत्रकाद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिका-यांना उद्देशून म्हटले आहे की, आपल्या जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृहे, शासकीय खानावळ, मध्यान्ह भोजन योजना, अंगणवाडी, शैक्षणिक संस्थांतर्गत चालवण्यात येणा-या खानावळी इत्यादींना एलपीजी गॅस सिलिंडरच्या १०० टक्के वाटपाबाबतची कार्यवाही करण्यात यावी आणि त्याबाबतचा अहवाल शासनास दररोज सादर करण्यात यावा.
कोणत्या क्षेत्राला किती मिळणार गॅस?
सरकारच्या निर्देशांनुसार, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक सेवांना १०० टक्के गॅस पुरवण्यात येईल. स्मशानभूमी, वृद्धाश्रम व अनाथाश्रमांनाही १०० टक्के गॅस पुरवठा करण्यात येईल. तर उपहारगृहे, संरक्षण क्षेत्र, शासकीय व सार्वजनिक क्षेत्र, रेल्वे, हवाई वाहतूक, पोलिस/तुरुंग यांना ७० टक्के गॅसचा पुरवठा केला जाईल. याशिवाय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, औषध उद्योग, बीज प्रक्रिया व मत्स्यपालन क्षेत्राला ५० टक्के गॅस पुरवठा करण्याची मर्यादा सरकारने आखून दिली आहे.
महाराष्ट्राला झळा
इराण विरुद्ध इस्त्रायल-अमेरिका युद्धाच्या थेट झळा आता महाराष्ट्राला बसत आहेत. राज्यात जवळपास सर्वच शहरांत स्वयंपाकाच्या गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे गॅस एजन्सीपुढे नागरिकांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. त्यातच सरकारने व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर निर्बंध घातल्यामुळे हॉटेल व्यावसायिकही अडचणीत सापडलेत. पण त्यांनी या ही बिकट परिस्थितीत चूल पेटवून आपला व्यवसाय पुढे चालवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
