27.7 C
Latur
Friday, February 28, 2025
Homeउद्योगगौतम अदानींनी सुरु केला सर्वात मोठा शस्त्र निर्मितीचा कारखाना

गौतम अदानींनी सुरु केला सर्वात मोठा शस्त्र निर्मितीचा कारखाना

कानपूर : अदानी डिफेन्स अँड एअरोस्पेसतर्फे कानपूरमध्ये दारूगोळा आणि क्षेपणास्त्रांच्या निर्मिती करणा-या कॉम्प्लेक्सचे उद्घाटन करण्यात आले. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ५०० एकरमध्ये पसरलेले हे कॉम्प्लेक्स दक्षिण आशियातील सर्वात मोठे असेल.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले, ही सुविधा पंतप्रधान मोदींच्या स्वावलंबी भारत मोहिमेच्या यशाचा पुरावा आहे आणि उत्तर प्रदेश औद्योगिक शक्तीस्थान बनले आहे.

या प्रसंगी ‘एपीसेझ’चे व्यवस्थापकीय संचालक करण अदानी म्हणाले की, या प्रकल्पाचा प्रभाव केवळ संरक्षणापुरता मर्यादित नाही तर तो खूप पुढे होणार आहे. याची सुरुवात १,५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने होत आहे, जी पुढील ५ वर्षांत ३००० कोटी रुपयांपर्यंत वाढवली जाईल.

या प्रकल्पामुळे चार हजार लोकांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे. त्याचा परिणाम एमएसएमई आणि स्थानिक परिसंस्थेवरही दिसून येईल. या कॉम्प्लेक्समध्ये सौर ऊर्जा आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.

करण अदानी यांनी सांगितले की, या कॉम्प्लेक्समध्ये सशस्त्र दल, निमलष्करी दल आणि पोलिसांसाठी उच्च दर्जाचे लहान, मध्यम आणि मोठ्या आकाराचा दारुगोळा तयार केला जाईल. ते म्हणाले की या सुविधेने लहान कॅलिबर दारुगोळ्याचे उत्पादन सुरू केले आहे, जे भारताच्या वार्षिक गरजेच्या २५% असेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR