नवी दिल्ली : अखेर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीर यांची नियुक्ती झाली. हे अपेक्षितही होते; मात्र टी-२० विश्वचषकामुळे औपचारिक घोषणा उशिरा करण्यात आली. या पदासाठी डब्ल्यू, व्ही. रमण, रिकी पाँटिंग, जस्टिन लैंगर असे अनेक दिग्गज इच्छुक होते; पण गौतम गंभीरने स्वत: इच्छा व्यक्त केली, तेव्हा ही सर्व नावे मागे पडली.
या पदावर गंभीरची वर्णी लागणे योग्यच म्हणावे लागेल. गंभीर ४२ वर्षांचे युवा आहेत. ते खेळाडूंचा ‘माइंडसेट’ जवळून समजतात. सध्याच्या काही खेळाडूंसोबत ते खेळलेही आहेत. आयपीएलमध्ये मेंटॉर म्हणून काही खेळाडूंना त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. कसोटी, वनडे आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारांत त्यांच्याकडे भक्कम अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनात काही चांगल्या गोष्टी घडल्यामुळे खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात त्यांना कुठलाही अडथळा येईल, असे वाटत नाही. भारतीय संघ सध्याच्या घडीला दमदार वाटतो. इथून पुढे हा संघ जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट संघ बनू शकतो. क्लाइव्ह लॉइड आणि व्हिवियन रिचर्डस यांच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजने, तर अॅलन बॉर्डर, स्टीव्ह वॉ, रिकी पाँटिंग यांच्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाने अशीच भरारी घेतली होती. त्याच वळणावर टीम इंडिया आहे. कुठल्याही संघाला सतत विजयाची सवय लावणे ही चांगली बाब मानली जाते. गौतम गंभीर विजयाची भूक खेळाडूंमध्ये निर्माण करू शकतात.
शानदार कामगिरीची संधी
गंभीर यांच्या मार्गदर्शनात भारतात आगामी काळात चॅम्पियन्स ट्रॉफी, विश्व कसोटी चॅम्पियनशिप (दोन्ही २०२५), टी-२० विश्वचषक (२०२६) आणि वन-डे विश्वचषक (२०२७) अशा सलग मोठ्या स्पर्धा जिंकू शकतो. गंभीर यांच्याकडे या संघाला पुन्हा चॅम्पियन बनविण्याची संधी वारंवार असणार आहे.