दिमापूर : जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ३० जून रोजी लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर ईशान्येचा पहिला दौरा केला. यावेळी त्यांनी अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील चीन सीमेवरील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. आपल्या दोन दिवसांच्या दौ-यात जनरल द्विवेदी यांनी दिमापूर येथे मुख्यालय असलेल्या २ कॉर्प्ससह पूर्व लष्करी कमांडच्या अंतर्गत सर्व कॉर्पस् फॉर्मेशनला भेट दिली. यादरम्यान, त्यांना मणिपूरमधील सद्य परिस्थितीबद्दल माहिती देण्यात आली, जिथे गेल्या एक वर्षापासून मोठ्या प्रमाणावर जातीय हिंसाचार झाला आहे.
लष्कराच्या एका अधिका-याने सांगितले की, गुरुवारी त्यांच्या दौ-याच्या सुरुवातीला लष्करप्रमुख द्विवेदी तेजपूर येथील गजराज ४ कॉर्प्समध्ये पोहोचले, या ठिकाणी त्यांना चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सद्य परिस्थिती आणि तेथील ऑपरेशनल तयारीबद्दल माहिती देण्यात आली. यानंतर सुकना येथील ३३ कॉर्प्स मुख्यालयाच्या भेटीदरम्यान लष्करप्रमुखांनी सिक्कीममध्ये सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्पांचाही आढावा घेतला. या दौ-यात लष्करप्रमुखांसोबत पूर्व लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल आर. सी. तिवारी होते.