मुंबई : अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत. त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिले जाते. गेली कित्येक वर्ष ते दोघेही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. अनेक सिनेमांमध्येही ते एकत्र काम करताना दिसले. ही जोडी प्रेक्षकांची लाडकी आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांच्यासारखा नवरा मिळणे हे भाग्य असल्याचे म्हटले.
निवेदिता सराफ यांनी मराठी बॉक्स ऑफिसला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्या म्हणाल्या मला असे वाटते की गेल्या जन्मी काहीतरी पुण्यकर्म केले होते म्हणून मला अशोक सराफांसारखा नवरा आणि सासर मिळाले. कारण, आपल्या देशांमध्ये लग्न हे दोन व्यक्तींमध्ये नाही तर दोन कुटुंबांमध्ये होते. त्यामुळे लग्न म्हणजे दोन कुटुंबांचे एकत्र येणे असते. जेव्हा माझे सासरे होते तेव्हा अशोक मला जोरात हाक मारायची पण हिंमत करू शकत नव्हते.
ते त्यांना नेहमी म्हणायचे की मी तुझ्या आईशी असे वागताना कधी पाहिले आहेस का? दुर्देवाने माझे वडील आणि सासरे दोघेही खूप लवकर गेले. त्यामुळे त्यांचा फार सहवास मला मिळाला नाही. पण, माझ्या नणंदा…माझी मोठी नणंद अमेरिकेला असते त्या तिथेही माझी मालिका बघत आहेत. माझी दुसरी नणंद अजूनही माझं काम बघतात आणि त्या सगळ्यांनाच माझ्या कामाबद्दल फार कौतुकही आहे असेही पुढे निवेदिता सराफ म्हणाल्या.