23.7 C
Latur
Friday, June 28, 2024
Homeमहाराष्ट्रआरक्षणावरून राज्यात घमासान!

आरक्षणावरून राज्यात घमासान!

जरांगे-भुजबळ आमने-सामने

नाशिक/वडीगोद्री : प्रतिनिधी
राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत तर मराठा बांधवांना वेगळे आरक्षण द्यावे, ओबीसीमधून देऊ नये अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे. यामुळे राज्यामध्ये मराठा व ओबीसी आरक्षणावरून राजकारण तापले आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील व ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. जरांगे पाटील यांनी भुजबळांचे राजकीय करिअर संपवतो असा घणाघात केला होता. त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ओबीसी आरक्षणासाठी जालन्यामध्ये लक्ष्मण हाके मागील दहा दिवसांपासून उपोषणावर आहेत. मराठा बांधवांना वेगळे आरक्षण द्यावे, ओबीसीमधून देऊ नये अशी मागणी त्यांनी केली आहे. आरक्षणावरून छगन भुजबळ देखील आक्रमक झाले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी जरांगे पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. मंत्री भुजबळ म्हणाले, आम्ही म्हणत नाही की मराठा बांधवांवर अन्याय करा. आमचे असे मत आहे की त्यांना वेगळे आरक्षण द्या. तसेच सारथीच्या माध्यमातून ज्या सवलती ओबीसी विद्यार्थ्यांना दिल्या जात आहेत त्याच सवलती मराठा विद्यार्थ्यांना देखील दिल्या जात आहेत. ओबीसी विद्यार्थ्यांपेक्षा माझ्या माहितीप्रमाणे जास्त सुविधा मराठा विद्यार्थ्यांना दिल्या जात आहेत, असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

जनतेचे कोर्ट सर्वश्रेष्ठ
पुढे छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. राजकीय करिअर संपवून टाकू या टीकेला भुजबळ म्हणाले, ठीक आहे. मी तर मंत्रिपदाचा देखील राजीनामा दिलेला आहे तिथे आमदारकीचे काय घेऊन बसला आहेत. तसेच माझे राजकीय करिअर चालवणे, पुढे नेणे आणि संपविणे हे सगळे आमची पार्टी व त्याचबरोबर जनतेच्या हातात आहे. जनता सर्वश्रेष्ठ आहे. जनतेचे कोर्ट सर्वश्रेष्ठ आहे. छगन भुजबळला घरी बसविले तरी देखील मी ओबीसींचा मुद्दा रस्त्यावर का होईना लढत राहणार आहे, असे ठाम मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

सरकारने सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करावी : राऊत
बिहारमध्ये वाढीव आरक्षण न्यायालयाने अमान्य केले आहे. आपल्या राज्यातही आरक्षणावरून संघर्ष सुरू आहे. राज्य सरकारने टिकाऊ आरक्षण देऊ असे म्हटले आहे. पण हे आरक्षण कसे टिकेल? यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आरक्षणावरून जो संघर्ष सुरू आहे, तो थांबवायचा असेल तर सरकारला सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणे गरजेचे आहे.अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

सरकारने मराठा समाजाला फसविले : अंबादास दानवे
सरकार मराठ्यांना फसवत आहे आणि दुटप्पी भूमिका घेत आहे. सग्यासोय-यांचे नोटिफिकेशन काढले परंतु ते न झाल्याने जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. सग्यासोय-यांची अंमलबजावणी झाली नाही म्हणून मराठ्यांना न्याय मिळाला नाही, असे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले. ज्यांच्या नोंदी मिळत आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळाले पाहिजे आणि त्या आधीपासून मिळतात. पाच नातेवाईकांचे नाव ओबीसीमध्ये असल्यास ओबीसींचे प्रमाणपत्र मिळते, सरकारने यामध्ये नवीन काही केले असे नाही, उलट सरकारने यात मराठ्यांची फसवणूक केली आहे.

जातनिहाय जनगणना करून टाका : उदयनराजे भोसले
मी जातपात मानत नाही. पण मराठा आरक्षणप्रश्नी २३ मार्च १९९४ चा अध्यादेश हा कळीचा मुद्दा आहे. त्यात मराठ्यांना डावलून माळी, धनगर, वंजारी असे सर्वांना आरक्षण देण्यात आले. त्यामुळे सध्या जातीजातीत तेढ निर्माण झाला असून दिवसेंदिवस जातीजातीत दुफळी माजत आहे. त्यामुळे एकदाची जातनिहाय जनगणना करून ज्यांना त्यांना वाट्याप्रमाणे आरक्षण देऊन टाकावे असे खासदार उदयनराजे भोसले म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR