सोलापूर: तीन वर्षांपूर्वी घेतलेल्या कर्जापोटी बँकेकडून गाइडलाइननुसार सील केलेले घर लिलावात काढण्यात आल्यानंतर कर्जदाराच्या नातलग तरुणीने घर गेल्याच्या मानसिकतेतून तिचा मृत्यू झाल्याचा दावा मुलीच्या नातलगांनी केला. मयत तरुणीचा मृतदेह बँकेसमोर ठेवण्याच्या हालचाली झाल्या. पोलिस यंत्रणेने बैंक प्रशासन, नातलगांची चर्चा घडवून आणली गेली. बँकेच्या वरिष्ठ स्तरावरुन चर्चेनंतर तोडगा काढण्यात आला. लिलावातील घर पुन्हा ताब्यात देण्याची नियमानुसार प्रक्रिया राबवण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.
भूमिका हरिश वाघमारे (वय १८, रा. न्यू पाच्छा पेठ, पोलिस मुख्यालयाच्या बाजूला, सोलापूर, सध्या आदर्श नगर, लक्ष्मी नारायण टॉकीजवळ, सोलापूर) असे मयत तरुणीचे नाव आहे.
मयत तरुणीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. यात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यासंदर्भात नातलगांपैकी विठ्ठल माने यांनी संबंधीत प्रकार महाराष्ट्र बैंक, जुळे सोलापूर शाखेने कर्जापोटी घेतलेले घर सील केल्याने नैराश्येतून मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा केला. संबंधीत तरुणीचा मृतदेह बँकेसमोर ठेवण्याचा पवित्रा घेतला गेला.
सदर तरुणीचा मृतदेह आदर्श नगर लक्ष्मीनारायण टॉकीजजवळ, सोलापूर येथून बँकेकडे हलवण्याचा प्रयत्न सुरु होता. दरम्यान, एमआयडीसी पोलिस ठाण्यास या प्रकाराची खबर मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी घटनास्थळी भेट दिली. नातलगांशी चर्चा करून काही नातेवाइकांना सोबत घेऊन बैंक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. सोबत विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब गायकवाडही होते. बँकेचे मॅनेजर लक्ष्मण डांबरे यांच्याशी चर्चा होऊन पुढे विभागीय व्यवस्थापकांशी झालेल्या चर्चेनंतर तोडगा काढून लिलावातील घर परत देण्यावर बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार तोडगा काढण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.पोलिस यंत्रणा, बैंक व्यवस्थापन आणि नातलगांशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर दुपारी भूमिका हिचे पार्थिव सील केलेले घर उघडल्यानंतर काही काळ तेथे ठेवून अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे मुलीचे आजोबा विठ्ठल माने यांनी सांगितले.
संबंधीत जागेसंदर्भात शैला चंद्रकांत वाघमारे व हरिश वाघमारे या दोघांनी जुळे सोलापूर महाराष्ट्र बँकेकडून तीन वर्षांपूर्वी कर्ज घेतले होते. कर्जापोटी बँकेच्या नियमानुसार मालमत्तेला सील ठोकले होते, वरिष्ठांशी झालेल्या चर्चेनुसार तोडगा काढण्यात आला.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये, शांतता सुव्यवस्थेला बाधा येऊ नये, यासाठी आमच्या हद्दीत मृत तरुणीचा मृतदेह अन्यत्र न हलवता नातलगांची समजूत काढली. त्यांच्या प्रतिनिधींसमवेत बँक प्रशासनाशी भेट घडवून आणली. त्यातून हे प्रकरण शांततेने हाताळण्यात आले.असे एमआयडीसी पोलिस ठाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी सांगीतले.
सकाळपासून या प्रकरणामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. आदर्श नगर लक्ष्मीनारायण टॉकीज परिसरात नातलगाच्या घरी मयत भूमिका हरिश वाघमारे हिचा मृतदेह होता तेथे आणि दावत चौक महाराष्ट्र बैंक जुळे सोलापूर परिसरात पोलिस बंदोबस्त चोख ठेवला होता.