सांगली : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाहीमध्ये एका तरूणीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाच सांगलीमध्ये एका शिवशाहीमध्ये तरूणीची छेड काढल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
या छेडछाड प्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी मयूर कांबळे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव कांबळे, असे या संशयित तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून सांगलीला एक तरुणी शिवशाही बसमधून येत होती. यावेळी आष्टा परिसरात संशयीत आरोपी मयूर कांबळेने तरूणीची छेड काढून तिचा विनयभंद केला. या घटनेनंतर सदर तरुणी ही भयभीत झाली. त्यानंतर सांगली बस स्थानकात गाडी पोहचताचं तरुणीने घडलेला सर्व प्रकार बस चालक आणि वाहकाला सांगितला.
यावेळी संशयित मयूर कांबळेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवाशांनी त्याला पकडून आधी चोप दिला आणि त्यानंतर त्याला शहर पोलिसांत घेऊन गेले. सांगली शहर पोलिस ठाण्यात मयूर कांबळेच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली. ते म्हणाले, गुरूवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास बस स्थानकावर महिला रडत थांबल्याचे निदर्शनास आले.
आरोपीस १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी
पोलिसांनी त्या महिलेला विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सर्व सांगितला आणि पोलिसांनी त्या आरोपीस तात्काळ अटक केली. त्यानंतर न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.