पुणे : प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराने तिच्या आईला संपवल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. प्रेयसीची आई त्यांच्या नात्याच्या विरोधात होती, त्यामुळेच दोघांचं ब्रेकअप झालं होतं. हाच राग मनात धरून त्याने प्रेयसीच्या आईचा गळा आवळून खून केला.
ही घटना ऐकून परिसरात खळबळ उडाली असून पोलिसही चक्रावले आहेत. पाषाणमध्ये सूस रोडजवळच्या एका सोसायटीमध्ये हा सर्व प्रसंग घडला आहे. मृतक महिला मुलीसोबत रहात होती. १ जानेवारी २०२४ रोजी पतीचे निधन झाले होते. मृत महिलेच्या मुलीच्या सांगण्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्या आरोपीला पोलिसांनी बेड्याही ठोकल्या आहेत. एकाच महिन्यात त्या मुलीने आई आणि वडिलांना गमावल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रिपोर्टनुसार, पाषाणच्या सूस रोडच्या माऊंटवर्ट अल्टसी सोसायटीमध्ये वर्षा क्षीरसागर (५८) मुलगी मृण्मयी क्षीरसागर (२२) हिच्यासोबत रहात होती. मृण्मयी कॉम्प्युटर इंजिनीअर आहे. सात महिन्यांआधी मृण्मयीची डेटिंग अॅपद्वारा शिवांशू दयाराम गुप्ता (२३) याच्यासोबत ओळख झाली होती. पहिल्या भेटीमध्ये दोघांना एकमेकांवर प्रेम जडले होते. पण मृण्मयीची आई या नात्याच्या विरोधात होती. मृण्मयीला या नात्यातून बाहेर येण्याचा सल्ला तिने दिला होता. वडिलांना गमावलेल्या मृण्मयीने आईचे म्हणणे मानले अन् शिवांशूसोबत ब्रेअकअप केले. हाच राग मनात धरून शिवांशूने मृण्मयीच्या आईचा बेल्टने गळा आवळून खून केला.