मुंबई : दादर रेल्वे स्थानकावर सोमवारी (ता. ६ जानेवारी) भरदिवसा एका महाविद्यालयीन तरुणीचे एका माथेफिरूने केस कापल्याची माहिती समोर आली आहे. १९ वर्षीय तरुणी सकाळी माटुंगा येथील महाविद्यालयात जात असताना तिच्यासोबत ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर माथेफिरूला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी कल्याण येथे राहणारी तरुणी माटुंगा येथील महाविद्यालयात जाण्यासाठी दादर रेल्वे स्थानकात उतरली. सकाळी ही तरुणी दादर स्थानकावर उतरल्यानंतर ती दादरच्या मेन ब्रीजवर आली. यानंतर तिकिट बुकिंग करतात त्या खिडकीजवळ पोहोचली असताना तिला मागच्या बाजूला अचानक काहीतरी काटेरी टोचल्यासारखे जाणवले. त्यामुळे तिने मागे वळून पाहिले असता, एक व्यक्ती बॅग घेऊन पुढे घाईघाईत जाताना दिसला.
याचवेळी तिने खाली पाहिले असता, तरुणीला केस पडलेले दिसले. ज्यामुळे तिने स्वत:च्या केसांवर हात फिरवला असता, तिला तिचे केस मध्येच कापल्याचे आढळले. ज्यानंतर घाबरलेल्या तरुणीने त्या माथेफिरूचा पाठलाग केला.या घटनेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले. तर नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी माथेफिरूला ताब्यात घेतले आहे.