लातूर : प्रतिनिधी
स्वत:ला ‘गतिमान’ म्हणवून घेणा-या राज्य सरकारने शेतकरी बांधवांना गणेशोत्सव, गौरी, दसरा, दिवाळी या सणांमध्ये पीक विम्याची अग्रिम रक्कम मिळवून दिली नाही त्यामुळे शेतकरी बांधवांना सण साधेपणाने करावे लागले. जाहीर झालेली मदत वेळेवर मिळत नसल्याने शेतक-यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे म्हणून आता तरी ‘वेगवान’ हालचाली करून अग्रिम रक्कम सरकारने शेतक-यांना मिळवून द्यावी, अशी मागणी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केली. सरसकट दुष्काळाच्या सवलती तातडीने लातूर जिल्ह्यात लागू कराव्यात, असेही ते म्हणाले.
दिवाळीआधी पीक विमा भरपाईच्या २५ टक्के रक्कम अग्रिम मिळायला हवी होती. दिवाळी उलटून आठवडा होत आला तरी ही रक्कम लातूर जिल्ह्यात अद्याप मिळाली नाही. या बरोबरच, दुष्काळ जाहीर झाला असला तरी त्याच्या सवलती शेतकरी व सर्वसामान्यांसाठी लागू झाल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची सोमवार, दि. २० नोव्हेंबर रोजी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
आमदार धिरज देशमुख म्हणाले, यंदा लातूरसह राज्याच्या अनेक भागांत पावसाने पाठ फिरवली त्यामुळे सोयाबीन व अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. रबीसुद्धा संकटात सापडली आहे. अशा अडचणीच्या काळात ‘गतिमान’ म्हणवून घेणा-या सरकारने शेतकरी बांधवांना तात्काळ अग्रिम रक्कम दिली असती तर ही दिवाळी बळीराजाला अधिक आनंदात साजरी करता आली असती. आता तरी ‘वेगवान’ हालचाली करीत सरकारने शेतकरी बांधवांना अग्रिम रक्कम मिळवून द्यावी. या सोबतच सरसकट दुष्काळाच्या सवलती ताडतीने लातूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना, शेतक-यांना द्याव्यात, अशी आमची मागणी
आहे.