मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावे अशी मागणी उद्धव सेनेचे नेते,दिंडोशी विधानसभेचे आमदार सुनील प्रभू यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज ईमेलद्वारे केली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कराने सन्मानित करणे हे त्यांच्या अत्युच्य कार्याची दखल घेणे होईल. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्र सरकारला आपण शिफारस करावी अशी विनंती आमदार सुनील प्रभू यांनी पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. आमदार प्रभू यांनी माहिती दिली.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपले सर्व आयुष्य महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या हितासाठी समर्पित केले. ते केवळ एका राजकीय पक्षाचे नेते नव्हते, तर असंख्य लोकांच्या हृदयातील प्रेरणास्थान होते.मराठी जनेतेचे हक्क,अस्मिता आणि स्वाभिमान यासाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे.त्यांच्या कर्तृत्वामुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनावर स्थायी प्रभाव आहे असे आमदार सुनील प्रभू यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी आणि नेतृत्वाने महाराष्ट्राला दिशा दिली.त्यांचा ठाम राष्ट्रभक्तीचा संदेश आणि सामान्य जनतेशी असलेली कळकळ आजही लाखो लोकांना प्रेरणा देते.भारतरत्न हा सन्मान त्यांच्या साठी योग्य श्रद्धांजली ठरेल,तसेच त्यांच्या कार्याचा राष्ट्रीय गौरव होईल असे त्यांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे.