मुंबई : मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र वाटपावरुन शासन-प्रशासनाला खडे बोल सुनावले. त्यानंतर सरकारला जाग आली असून मराठ्यांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र वाटप करा, असे आदेश सर्व जिल्हाधिका-यांना मुख्य सचिवांनी दिले.
कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना तात्काळ प्रमाणपत्र वाटप करा, असे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिका-यांना दिले आहेत. मराठवाड्यामध्ये सर्वात कमी नोंदी सापडल्याचा मुद्दा मनोज जरांगे यांनी उपस्थित केला होता. शिवाय ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत, त्यांना अधिकारी जाणीवपूर्वक कुणबी प्रमाणपत्र देत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता.
त्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिका-यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचे आदेश दिले. मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं की, प्रमाणपत्र वाटप करण्याचा आदेश दिला खरा पण त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. ५४ लाख नोंदींपैकी किती लोकांना प्रमाणपत्र दिली, त्याची माहिती सरकारने आम्हाला द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
मुख्य सचिवांनी आदेश दिले असले तरी आम्ही लगेच हुरळून जाणार नाही. असल्या आदेशांना काहीही अर्थ नसतो. जेव्हा कुणबी प्रमाणपत्र वाटप केलं जाईल, तेव्हा खरं. सरकार जर राज्यभर शिबिरं घेऊन कुणबी प्रमाणपत्र वाटप करणार असेल तर चांगलंच आहे. परंतु हे त्यांना आधीच सुचायला पाहिजे होतं, असं म्हणत जरांगे पाटलांनी २० जानेवारीच्या मुंबई आंदोलनाचा निर्धार पक्का असल्याचं स्पष्ट केलं.