मुंबई : प्रतिनिधी
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही आता एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक झाले आहेत. या दोन्ही नेत्यांच्या पक्षाचे नेतेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत हे तर नेहमीच शिंदे यांच्यावर टीका करतात. सध्या मात्र त्यांनी पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते चांगलेच भडकले आहेत. राऊत यांनी पोस्ट केलेल्या फोटोवर शिंदे यांच्या नेत्यांनीही जशास तसे उत्तर दिले आहे.
संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोत एक बकरा दाखवण्यात आला होता. विशेष म्हणजे हा बकरा एका लाकडावर उभा होता. सोबतच ‘खबर पता चली क्या, एसंशिं गट’ असे कॅप्शनही त्यांनी दिले होते. महाराष्ट्रात एक बकरा आहे. तो बकरा खाटकाच्या लाकडावर उभा आहे. त्या लाकडावरती या बक-याला उभं केलेलं आहे. सोबतच फार शहाणपणा केलास तर मान उडवीन, असे या बक-याला सांगितलेले आहे. गप्प उभे राहायचे आणि बें-बें करत राहायचे, असे या बक-याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितलं आहे, असेही राऊत म्हणाले होते. राऊतांनी अपलोड केलेल्या या फोटोवर नंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या.
नरेश म्हस्के यांनी ट्विट केला गाढवाचा फोटो
राऊतांनी हा फोटो अपलोड करताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा खासदार नरेश म्हस्के यांनी एका गाढवाचा फोटो अपलोड केला होता. एक उपहासात्मक कविताही अपलोड केली होती. ‘नवाच्या भोंग्याने संरारा दिली पुन्हा बांग, पुन्हा एकदा नको तिथे, घातलीस बघ टांग. मालकाने टाकलेले खाऊन बें बें रोज सकाळी करायचे, जगातल्या कोणत्याही विषयावर मूर्खासारखे बरळायचे. तुमची अक्कल आणि ताकद दिसली सगळ्यांना निवडणुकात, जनतेने भडकावली ना सणसणीत थोबाडात? आम्ही बकरे आहोत की वाघ ते ठरवलंय जनतेने, मला वाटतं जास्त भेकू नये गप्प बसावं गाढवाने’उबाठा’ असे नरेश म्हस्के यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
शिरसाट यांचीही संजय राऊतांवर टीका
यासह शिंदे यांच्या पक्षाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनीही संजय राऊत यांच्यावर टीका केली. असे ट्विट करून राजकारण चालत नसते. संजय राऊत आम्ही कमीत कमी बक-याच्या भूमिकेत आहोत. तुम्ही मांजराच्या भूमिकेतही नाहीत. तुम्ही बिळात राहणारे उंदीर आहात. तुम्हाल याच उंदराच्या भूमिकेत राहावे लागणार आहे, अशी खोचक टीका संजय शिरसाट यांनी केली आहे.