24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeउद्योगसोने-चांदी स्वस्त!

सोने-चांदी स्वस्त!

सोन्या-चांदीत मोठी घसरण सीमा शुल्कात केली कपात

नवी दिल्ली : मोदी ३.० सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर केला. या बजेटकडून मोठ्या अपेक्षा होत्या. त्यात सोने-चांदीच्या वाढत्या किंमतींबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता होती. सीमा शुल्कात कपातीची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार, केंद्र सरकारने सीमा शुल्कात कपात केली. त्यामुळे सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाली. आज सकाळच्याकिंमतीत आणि थोड्या वेळापूर्वीच्या किंमतीत त्यामुळे बदल दिसला. आता सराफा बाजारात या एका निर्णयाने मोठा फरक दिसून येणार आहे. ग्राहकांच्या खिशावरील ताण कमी होणार आहे.

केंद्र सरकारने सीमा शुल्कात कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार सोने आणि चांदीवरील कस्टम ड्यूटी १५ टक्क्यांहून कमी करण्यात आली. आता सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क ६ टक्के इतके कमी करण्यात आले आहे. कस्टम ड्यूटीत अर्ध्यांहून अधिक कपात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सराफा बाजारात आता पुन्हा चैतन्य दिसून येईल.

सोने ७० हजारांवर
केंद्र सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात सोने आणि चांदीवरील सीमा शुल्कात वाढ केली होती. कस्टम ड्यूटी १५ टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. आज केंद्रीय अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी सीमा शुल्कात मोठी कपात करण्याची घोषणा केली. त्यानुसार आता कस्टम ड्युटी १५ टक्क्यांहून ६ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मंगळवारी सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण दिसली. सोने जवळपास २ हजार रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त झाले. बजेट संपताच लागलीच सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम १९८८ रुपयांपर्यंत खाली आली. या घसरणीनंतर सोने ७०७३० रुपये प्रति १० ग्रॅमवर आले.

चांदी ८५ हजारांवर
चांदीच्या किंमतीत बजेट संपल्यानंतर मोठी घसरण दिसली. चांदीच्या किंमतीत प्रति किलो २४२९ रुपयांची घसरण दिसली. बजेट संपल्यानंतर चांदीची किंमत ८६७७४ रुपये प्रति किलोवर आल्या. सोने आणि चांदीच्याकिंमती घसरल्याने बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होण्याची सराफा दुकानदारांची अपेक्षा आहे. जर सोने आणि चांदीची मागणी वाढली तरी किंमतीत बदल दिसू शकतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR