जळगाव : सोने आणि चांदीने गेल्या आठवड्यापासून दरवाढीचे अनेक रेकॉर्ड केले आणि अनेक रेकॉर्ड मोडीत काढले. ऐन लग्नसराईत सोने-चांदीतील ही दरवाढ ग्राहकांच्या उत्साहावर पाणी फेरणारी ठरली. जळगावच्या सुवर्णनगरीत पण सोने-चांदीचे दाम गगनाला भिडले होते.
पण सोन्याच्या दरात मंगळवारी एकाच दिवसात एक हजार ३०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोने ६३ हजार रुपये प्रति तोळ्यावर आले. चांदीच्या भावातही दोन हजार रुपयांची घसरण होऊन ती ७६ हजार रुपये प्रति तोळ्यावर आली आहे. लग्नसराई असल्याने ग्राहकांना सोने-चांदीचे दर कमी झाल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
गेल्या आठवड्यापासून सोने-चांदीचे भाव सतत वाढत आहेत. सोमवारी सोने ६४ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर तर चांदी ७८ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली होती. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात भाव वाढल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर सट्टा बाजारात अचानक सोने-चांदी विक्रीला काढण्यात आले. त्यामुळे त्यांचे भाव कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या परिणामामुळे मंगळवारी सोन्याच्या भावात १३०० रुपयांची तर चांदीत दोन हजार रुपयांची घसरण झाली.