28.4 C
Latur
Sunday, March 16, 2025
Homeअंतरराष्ट्रीयसोन्यामुळे महागाईचे दिवस; जग मंदीच्या उंबरठयावर

सोन्यामुळे महागाईचे दिवस; जग मंदीच्या उंबरठयावर

सोन्याची झळाळी आणि मंदीचा फेरा सुरू

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु टॅरिफ वॉर (व्यापार युद्ध) आता बरेच व्यापक झाले आहेत. यामुळे जागतिक व्यापाराबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. जागतिक बाजारात सोन्याच्या किमतींनी विक्रमी उच्चांकावर झेप घेतली आणि प्रथमच प्रति औंस ३,००० अमेरिकन डॉलर्सचा आकडा ओलांडला. जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोन्याची खरेदी वाढवल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाल्याचा ब्लूमबर्गच्या एका अहवालात दावा करण्यात आला आहे.

गेल्या एका वर्षापासून सोन्याच्या किमतीत वाढ होत असून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस ३,००० डॉलर्सच्या पुढे गेला तर, देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरांनी प्रति १० ग्रॅम ८७,९७० रुपयांवर उडी घेतली आहे. रशिया-युक्रेन युद्धापासून जगभरात अनिश्चितता पसरली तर, आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ वॉर सुरू करून परिस्थिती आणखी चिघळवली आहे. अनेक तज्ञ जगात मंदी येण्याची शक्यताही वर्तवत असून इतिहास साक्षी आहे की जेव्हा-जेव्हा जागतिक अनिश्चितता वाढते तेव्हा सोने गुंतवणूकदारांसाठी सर्वात सुरक्षित पर्याय बनतो.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणांमुळे जागतिक व्यापारासाठी धोकादायक संकेत मिळत असून डॉलर आणि सोने या व्यापार युद्धाच्या केंद्रस्थानी आहेत. कॅनडा, मेक्सिको आणि चीनमधून आयात होणा-या वस्तूंवर कर लादून ट्रम्प यांनी पहिले पाऊल उचलले. त्याचवेळी, प्रत्युत्तरात या तीन देशांनी आणि युरोपियन युनियननेही अमेरिकन आयातीवर प्रति-शुल्क लादले. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा परिणाम केवळ अमेरिकेपुरता मर्यादित राहणार नाही तर, १३ मार्च रोजी जर्मनीच्या मध्यवर्ती बँकेने, बुंडेसबँकेने अमेरिकेच्या टॅरिफ धोरणांमुळे जर्मनीत देखील मंदी येण्याचा इशारा दिला.

मंदीशी सोन्याचे संबंध काय?
मंदीचा परिणाम अनेक क्षेत्रांवर पडतो. चलने, शेअर बाजार, रिअल इस्टेट आणि मालमत्तेच्या किमती झपाट्याने घसरतात. ज्यामुळे, लोकांचे भांडवल बाजारातून बाहेर पडू लागते आणि आर्थिक परिस्थिती आणखी बिकट होऊ लागते. मंदीच्या काळात गुंतवणूकदार सुरक्षित मालमत्तेकडे वळतात तेव्हा स्वाभाविक सोन्याच्या किमती वाढतात. मंदीच्या काळात सरकार अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी जास्त पैसे छापतात, ज्यामुळे महागाई वाढते. अशा वेळी एकमेव सोनंच आहे जे आपले मूल्य टिकवून ठेवते आणि गुंतवणूकदारांसाठी एक विश्वासार्ह पर्याय बनते.

सोन्याची गुंतवणूक सुरक्षीतच
मंदीच्या काळात तुमच्या पोर्टफोलिओत सोने असल्यास तुमची गुंतवणूक सुरक्षित राहते. सरकारने वेळेवर पावले उचलली नाहीत तर मंदीचे संकट आणखी गहिरे होऊ शकते, ज्याला तोंड देण्यासाठी सरकारे जास्त पैसे छापतात, ज्यामुळे महागाई वाढते. याशिवाय परिस्थिती हाताबाहेर गेल्यास अति चलनवाढ होऊ शकते, जिथे चलनाचे मूल्य वेगाने घसरू लागते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR