मुंबई : प्रतिनिधी
सोन्याच्या दागिन्यांच्या किमती महागण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकारने सोने आणि चांदीच्या पिन, हूक आणि नाणी यांसारख्या फायडिंग्ज उत्पादनांवर आयात शुल्क वाढवले आहे. या सोन्याच्या आणि चांदीच्या वस्तूंवरील आयात शुल्क आता १५ टक्के इतके करण्यात आले आहे. सरकारने या सर्वांवर ५ टक्के एआयडीसी म्हणजेच अॅग्रीकल्चर इन्फ्रा अँड डेव्हलपमेंट सेस म्हणजे उपकर लावला आहे.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने एका अधिसूचनेत म्हटले की मौल्यवान धातू असलेल्या घटकांवर आयात शुल्क वाढविण्यात आले आहे. आता त्यावर ४.३५ टक्के कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर लादण्यात आला आहे. मौल्यवान धातूंवरील आयात शुल्क बुलियनच्या बरोबरीने आणण्याच्या उद्देशाने एआयडीसी १० टक्के मूळ उत्पादन शुल्काव्यतिरिक्त लागू करण्यात आले आहे. २०२३ च्या अर्थसंकल्पात सरकारने सोने आणि प्लॅटिनमच्या बरोबरीने चांदीच्या उत्पादनांवर आयात शुल्क वाढवले होते. चांदीवरील मूलभूत सीमाशुल्क ७.५ टक्क्यांवरून १० टक्के आणि आयातीवर कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर २.५ टक्क्यांवरून ५ टक्के आणि चांदीच्या दोरीवर १० टक्के मूलभूत आयात शुल्क आणि ४.३५ टक्के एआयडीसी करण्यात आले. मौल्यवान धातूंपासून बनवलेल्या वस्तूंवरील आयात शुल्क २२ टक्क्यांवरून २५ टक्के करण्यात आले. सोन्यावरील आयात शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
२२ जानेवारीपासून लागू
सोने किंवा चांदीचे फायडिंग्ज म्हणजे हूक, क्लॅम्प्स, पिन किंवा स्क्रू बॅकसारख्या छोट्या उत्पादनांचा वापर सोन्या-चांदीच्या दागिन्यांमध्ये केला जातो. त्यातून एक मोठ्या दागिन्याची निर्मिती केली जाते. हे अतिरिक्त शुल्क २२ जानेवारीपासून लागू झाले आहे. २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात सरकारने कृषी पायाभूत वित्तपुरवठा करण्यासाठी काही उत्पादनांवर एआयडीसी उपकर लागू करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.