पूर्णा : पोलिस असल्याचे ओळखपत्र दाखवून शहरात दंगा होत आहे म्हणत वयोवृद्ध सेवानिवृत्त कृषी सहाय्यक कर्मचा-याजवळील ८० हजार रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या पळवल्याची घटना दि.८ रोजी घडली. या प्रकरणी दोघा अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामराव भुजगराव गव्हाणे (वय ७२) रा.आदर्श कॉलनी त्यांचा मुलगा हरिष गव्हाणे परगावी गेल्याने दि.८ रोजी ते मुलाच्या कमाल टॉकीज परिसरातील मेडीकल दुकानावर आले होते. दुपार पर्यंत व्यापार करुन ३ वाजण्याच्या सुमारास ते दुकान बंद करून घरी जात असताना चिटणीस कॉलनी जवळील रस्त्यावर दोन अनोळखी इसमांनी अडवून त्यांना पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवत पुढे दंगा होत आहे.
तुमच्या हातातील अंगठ्या काढुन खिशात ठेवुन जा असे सांगीतल्याने त्यांनी हातातील अंगठ्या काढुन खिशात ठेवताना त्यापैकी एकाने त्याच्या जवळचा कागद देऊन या कागदामध्ये तुमच्या अंगठ्या ठेवा असे म्हणुन त्या अंगठ्या कागदामध्ये पुडी करुन ठेवल्या. अंगठ्या असलेला कागद स्वत:च्या खिशात ठेवत हात चलाखीने खिशातील दुसरी पुडी दिली व दोघे मोटारसायकलवर निघुन गेले. थोड्या वेळाने खिशातील कागद काढुन पाहीले असता त्या कागदामध्ये दोन दगडाचे छोटे खडे दिसल्याने फसवणुक झाल्याचे लक्षात आले.
ही घटना घराशेजारी राहणारे कैलास इंगोले व सुरेश गव्हाणे यांना सांगुन चोरट्यांचा शोध घेतला. या प्रकरणी दि.१० एप्रिल रोजी पूर्णा पोलीसांत दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि. विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सोमेश्वर शिंदे हे तपास करीत आहेत.