36.3 C
Latur
Friday, April 18, 2025
Homeमहाराष्ट्रनाना पटोलेंच्या सपकाळ, वडेट्टीवारांना शुभेच्छा

नाना पटोलेंच्या सपकाळ, वडेट्टीवारांना शुभेच्छा

नागपूर : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ आणि विधिमंडळ पक्ष नेते म्हणून विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती केली आहे. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करून नाना पटोले यांनी पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पुढे बोलताना पटोले म्हणाले की, नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना संघटनेचा प्रदीर्घ अनुभव आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीचा त्यांना दांडगा अनुभव असून विविध पदावर त्यांनी काम केले आहे. राजीव गांधी पंचायत राज संगठनचे ते विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. विद्यार्थी दशेपासून ते राजकारण आणि समाजकारणात सक्रिय आहेत. जिल्हा परिषद सदस्यापासून विधानसभा सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले आहे. तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव पदासह पक्ष संघटनेत विविध पदावर काम करत त्यांनी त्यांच्या कार्याचा ठसा उमटवला आहे. काँग्रेस विचारांचे सच्चे पाईक, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या सर्वोदयी विचारांवर काम करणारे ते कार्यकर्ते आहेत असे नाना पटोले म्हणाले.

महाराष्ट्र राज्य काँग्रेस विचाराला माननारे राज्य आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देणारी ठरेल. त्यांच्या कारकिर्दीत काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात नव्या उंचीवर पोहचेल असा विश्वास व्यक्त करून पटोले यांनी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि नवनियुक्त विधिमंडळ पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांना केरळमध्ये पाठवण्यात येणार असून महाराष्ट्र काँग्रेसला नवे सरचिटणीस प्रभारी मिळू शकतात. काँग्रेस नेतृत्वाला विजय वडेट्टीवार यांच्याकडे दिल्लीत सरचिटणीसपदाची जबाबदारी द्यायची होती. पण त्यांना महाराष्ट्राबाहेर जाण्याची इच्छा नसल्याने त्यांना महाराष्ट्रातच जबाबदारी देण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR