22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रखुशखबर! मान्सून केरळात

खुशखबर! मान्सून केरळात

मुंबई : प्रतिनिधी
मान्सूनची ज्या आतुरतेने वाट पाहिली जात होती. तो मान्सून आता एक दिवस आधीच केरळात धडकला आहे. हवामान खात्याने यंदा मान्सून ३१ मे रोजी केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र, एक दिवस आधीच मान्सून दाखल झाल्याने आता महाराष्ट्रातही मान्सूनची लवकरच हजेरी राहील, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी ही माहिती दिली.

आज मान्सून केरळ राज्याच्या दक्षिण टोकावर पोहोचला असून, तेथे सक्रिय झाला आहे. या वर्षी ३१ मे रोजी मान्सून केरळात धडकेल, असा अंदाज वर्तवला होता. सामान्यपणे १ जून रोजी मान्सून केरळात धडकतो. दरम्यान, मान्सूनने केरळसोबत देशाच्या पूर्वोत्तर भागातील ७ राज्यातही प्रवेश केला आहे. मान्सून केरळच्या टोकावरील सक्रियतेनंतर उर्वरित केरळाचा बराचसा भाग, कन्याकुमारी, दक्षिण तामिळनाडू, मालदीव व लक्षद्विप भागापर्यंत मजल मारली आहे.

दरम्यान, मान्सून केरळात धडकताच मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील खान्देश, विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांत शनिवार दि. १ जून ते सोमवार दि. ३ जूनपर्यंत वादळी वा-यासह गडगडाटी वळीव पावसाची शक्यता वर्तवली आहे. मात्र, तोपर्यंत पुढील २ दिवसांत उष्णतेत अजून वाढ होण्याची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञ खुळे यांनी सांगितले. मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यांत मात्र आजपासून पुढील ३ दिवस म्हणजे एक जूनपर्यंत ढगाळयुक्त दमटयुक्त उष्णतेचे वातावरण कायम असेल. दरम्यान, केरळमध्ये आज मान्सूनचे आगमन झाले आहे. यानंतर ७ ते ८ जूनला राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, पुढील ३ दिवस मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचेही खुळे यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR