20.6 C
Latur
Sunday, October 27, 2024
Homeमहाराष्ट्रमहायुतीच्या राजकारणामुळे चांगले लोक दुरावले

महायुतीच्या राजकारणामुळे चांगले लोक दुरावले

मुंबई : एकट्या भाजपच्या भरोशावर हा विजय मिळणार नाही. तीनही पक्षांची बेरीज करून आम्ही विजयापर्यंत पोहोचतोय असा दावा करतानाच महायुतीच्या राजकारणामुळे अनेक चांगले नेते भाजप सोडून गेले अशी खंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

एका मुलाखतीत निष्ठावंतावर अन्याय होतोय, बंडखोरीची भीती आहे, त्यासाठी भाजपकडे योजना काय? असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, असे आहे की, राजकारणात आपल्याला व्यावहारिक असावे लागते आणि जमिनीवरची परिस्थिती काय आहे, हे समजून निर्णय करावे लागतात. आज जमिनीवरची परिस्थिती हीच आहे की, तीन पक्ष मिळूनच आम्हाला विजय मिळणार आहे.

ठाकरेंचे १७ उमेदवार आमचे नेते
एकट्या भाजपच्या भरोशावर हा विजय मिळणार नाही. तीनही पक्षांची बेरीज करून आम्ही विजयापर्यंत पोहोचतोय. हे खरंय की भाजप यातील सर्वांत प्रमुख पक्ष आहे. सर्वांत जास्त मते आमच्याकडे आहे. आमची मतांची टक्केवारीही जास्त आहे. मग अशा परिस्थितीत जेव्हा तुम्हाला ते पक्ष पाहिजेत, त्यांची मते पाहिजेत आणि त्यांना आम्ही जागा देणार नाही, असं नाही म्हणता येत. तडजोड करावीच लागते. हे खरंय की जेव्हा आपण तडजोड करतो, त्यावेळी काही लोकांवर अन्याय होतो. त्याचे दु:खही होते. कारण आम्ही आधी अडीच वर्ष २८८ जागांवर काम करत होतो.

अनेक नेते आम्ही तयार केले. त्यादिवशी मी बघत होतो, उद्धव ठाकरेंनी जी पहिली यादी घोषित केली. त्यात १७ लोकं आमची आहेत. आमचे १७ नेते आहेत. राजकारणात अलिकडच्या काळात कोणी थांबायला तयार नाही. त्यामुळे त्यांचे असे वाटते की, साहेब आम्ही एवढी तयारी केली. आम्ही निष्ठावंतच आहोत, पण तुम्ही जागा दुस-या पक्षाला दिली.

युतीत प्रत्येक जण स्वत:ला हिरो समजतोय
महाराष्ट्राची निवडणूक अशी आहे की, याठिकाणी सहा पक्ष प्रमुख आहेत आणि इतके पक्ष आहेत की, प्रत्येक कलाकाराला रोल आहे. इतके सिनेमे बनने चाललेले आहे. त्यामुळे प्रत्येक जण जो स्वत:ला हिरो समजतो. तो ज्या सिनेमात काम मिळेल तिथे चाललाय. मी नावे घेणार नाही, पण काही लोकांच्याबद्दल मला दु:खही आहे. कारण चांगली मंडळी आहेत, जी या युतीच्या राजकारणामुळे आमच्यापासून दूर गेली. त्याचे दु:ख आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR