मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाने २४ सप्टेंबरला सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन दुपटीने वाढवण्याचा निर्णय घेतला होतो. गाव गाडा हाकणा-या ग्रामपंचायतचे सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय २४ सप्टेंबर २०२४ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.
दरम्यान शासनाने दि. १३ फेब्रुवारी रोजी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या वेतन व सरपंच, उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता तसेच ग्रामपंचायत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी शासन सहायक अनुदान हिस्सा वितरीत करणे बाबत ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक: व्हीपीएम २०२४/प्र.क्र. १०२/पंरा-३ सह सचिव व. मु. भरोसे यांच्या स्वाक्षरीने जारी केला आहे.
या निर्णया अंतर्गत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात जानेवारी, २०२५ व त्या पुढील कालावधीतील ग्रामपंचायत कर्मचा-यांचे वेतन, सरपंच, उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता, ग्रामपंचायत कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधी रक्कम अदा करण्यासाठी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांचे १९ महिन्यांतील किमान वेतनातील थकीत फरक अदा करण्यासाठी सहाय्यक अनुदान रक्कम रु.३४६,२६,०८,०००/- (रुपये तीनशे शेहचाळीस कोटी सव्वीस लक्ष आठ हजार फक्त) इतका निधी वितरीत व खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे.