नवी दिल्ली : येत्या सोमवारपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी सांगितले की, या अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरसह सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यास सरकार तयार आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते हे बोलत होते. संसदेचे कामकाज सुरळीत चालविण्यासाठी सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये चांगले समन्वय असले पाहिजे असे आवाहनही रिजिजू यांनी सर्व पक्षांना केले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलिकडच्या विधानावरून विरोधी पक्ष सरकारला घेरण्याची तयारी करत आहे, ज्यामध्ये त्यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करून युद्धविराम आणल्याचे म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना रिजिजू म्हणाले की सरकार संसदेत या मुद्यावर योग्य उत्तर देईल. न्यायाधीश वर्मा यांना हटविण्यासाठी आणण्यात येणा-या महाभियोग प्रस्तावाला खासदारांचा चांगला पाठिंबा मिळत असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री रिजिजू यांनी दिली. ते म्हणाले की, १०० हून अधिक खासदारांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे.
पहलगाम, एसआयआरवर विरोधकांचा निशाणा
बैठकीत विरोधकांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले, जे ते संसदेत मोठ्याने उपस्थित करणार आहेत. यामध्ये बिहारमधील मतदार यादीच्या विशेष सुधारणा (एसआयआर) मध्ये अनियमिततेचे आरोप, अलिकडचा पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ट्रम्प यांचा वादग्रस्त दावा यांचा समावेश आहे. काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले की त्यांचा पक्ष तीन प्रमुख मागण्यांसह संसदेत पोहोचेल.
आपने निवडणूक घोटाळाचा मुद्दा उचलला
आप खासदार संजय सिंह यांनी बैठकीत एसआयआर प्रक्रियेला निवडणूक घोटाळा म्हटले आणि ते म्हणाले की ते देशाच्या लोकशाहीसाठी गंभीर धोका आहे. त्यांनी भारत-पाकिस्तान मध्यस्थीबाबत ट्रम्पच्या विधानांवरही चिंता व्यक्त केली.
सर्वपक्षीय बैठक पडली पार
ही बैठक सभागृह नेते आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यसभेत झाली. सरकारच्या वतीने किरेन रिजिजू आणि राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी बैठकीला हजेरी लावली. विरोधी पक्षाच्या वतीने काँग्रेसचे गौरव गोगोई आणि जयराम रमेश, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) सुप्रिया सुळे, द्रमुकचे टीआर बाळू, आरपीआय (अ) चे रामदास आठवले यांनी बैठकीला हजेरी लावली.