पुणे : प्रतिनिधी
गेल्या वर्षभरापासून सोयाबीन हमीभावावरून नाराज शेतक-यांना आता खरेदी केंद्रांवरही अडचणीच असल्याचे समोर येत आहे. बारदाना तुटवड्याने राज्यातील अनेक सरकारी सोयाबीन खरेदी केंद्रच ठप्प असून शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रचालकांनाही ही खरेदी पूर्वपदावर कधी येणार याबाबत कल्पना नसल्याचे समोर आले आहे. सरकारी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र गेल्या १२ दिवसांपासून बंद असून राज्यभरातील अनेक खरेदी केंद्रांवर शुकशुकाट पाहायला मिळतो.
राज्यात नाफेड आणि एनसीसीएफ सोयाबीनची खरेदी करत आहेत. राज्यभरात ५८५ केंद्रांना सोयाबीन खरेदीची परवानगी असली तरी प्रत्यक्ष खरेदी मात्र केवळ ५६१ केंद्रांनी सुरू केली होती. त्यातही अडचणी असून प्रत्यक्ष खरेदी सुरू असलेल्या केंद्रांमध्ये बारदान्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने खरेदी केंद्रच बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे .
बारदान्याचा तिढा, खरेदी केंद्र ठप्प
सोयाबीन उत्पादक शेतक-यांसाठी सरकारने सुरू केलेली हमीभाव खरेदी केंद्रं ठप्प झाली असून धाराशिवची शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रं गेल्या बारा दिवसांपासून बंद असल्याची माहिती आहे. सरकारी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र बारदाना (पोते) नसल्याने बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. सोयाबीन खरेदी केंद्र बंद असल्याची केंद्रचालकांकडून खरेदी केंद्रांवर बॅनरबाजी सुरू आहे. खरेदी केंद्रच ठप्प असल्याने सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी केलेल्या २५ टक्के शेतक-यांच्या सोयाबीनची खरेदी झाली नाही.
७५ टक्के शेतक-यांची खरेदी बाकी
सोयाबीन हमीभाव विक्रीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत राज्यातील ६ लाख ७९ हजार शेतक-यांनी नोंदणी केली आहे. मात्र प्रत्यक्षात सुमारे दीड लाख शेतक-यांचीच खरेदी होऊ शकली . म्हणजेच नोंदणीकृत शेतक-यांपैकी केवळ २५ टक्केच शेतक-यांच्या सोयाबीनची खरेदी झाली आहे. ७५ टक्के शेतक-यांना सोयाबीन विकायचे आहे.
६ जानेवारीपर्यंत नोंदणी सुरू
राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी, लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता सोयाबीन खरेदी नोंदणीची मुदत सात दिवसांनी म्हणजेच ६ जानेवारी २०२५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच्या निर्णयानुसार ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत होती. आता सोयाबीनच्या खरेदीसाठी ६ जानेवारीपर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे. तसेच नोंदणी केलेल्या शेतक-यांच्या सोयाबीनची खरेदी नाफेड आणि एनसीसीएफ यांच्यामार्फत १२ जानेवारीपर्यंत केली जाणार आहे, अशी महिती देखील पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
सोयाबीनची खरेदी ४ हजार ८९२ रुपयांनी
किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत राज्यात सोयाबीनची खरेदी ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल या हमीभावाने सुरू आहे. आतापर्यंत सोयाबीनची तीन लाख ३४ हजार ३३१ मेट्रिक टन एवढी विक्रमी खरेदी झाली आहे. मागील वर्षी केवळ ७ हजार ४०० क्विंटल एवढी खरेदी झाली होती. यावर्षी शेतक-यांना एक हजार कोटी रुपये मोबदला देण्यात आला आहे. राज्यात सध्या ५६१ खरेदी केंद्र सुरू असून आतापर्यंत ६ लाख ६९ हजार शेतक-यांनी नोंदणी केली आहे.