मुंबई : प्रतिनिधी
महायुती सरकारचे ‘इव्हेंट’ चाललेत, १०० फुटांचा रॅम्प करतात. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री रॅम्पवर चालतात. फॅशन-शो आहे काय? लाडकी बहीण म्हणून महिलांचा कार्यक्रम घेताना, फॅशन-शो करायला निघालेत, इव्हेंट करायला निघालेत, तिजोरी साफ करायला निघालेत, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार महायुती भाजप सरकारवर संतापले. एवढं दारिद्र्य आणि भ्रष्टाचारी सरकार महाराष्ट्रात कधी झालं नव्हतं, असाही टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.
काँग्रेस नेते तथा विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोलीतील घटनेवर संताप व्यक्त केला. तापाने फणफणलेल्या मुलांना वेळेवर उपचार न मिळाल्याने दोन मुलांना आपला जीव गमवावा लागला. रस्ते आणि रुग्णवाहिका नसल्याने, या मुलांचे मृतदेह आई-वडिलांनी खांद्यावर घेऊन आरोग्य केंद्रापर्यंत १५ किलोमीटर पायपीट केली. यावर विजय वडेट्टीवार हे गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्यावर संतापले.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत. गडचिरोलीमध्ये आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. गेली दहा वर्षे ते सत्तेत आहेत. आरोग्य यंत्रणा त्यांना बळकट करता आली नसती? असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी केला. रुग्णवाहिका नाही, डॉक्टर नाही, नर्स नाहीत, ७० टक्के जागा रिक्त करून ठेवल्या आहेत. आरोग्य खाते कुठे आहे? टेंडरसाठी आरोग्य खातं आहे काय? सर्वांत जास्त भ्रष्टाचार कोठे असेल, तर आरोग्य खात्यात आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
अन्न व औषध मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांच्यावर देखील विजय वडेट्टीवर भडकले. ते मंत्री काय करतात, पालकमंत्री काय करतात, दोन-दोन मृतदेह खांद्यावर टाकून घेऊन जावं लागतं, त्यांच्यावर वेळेवर उपचार होत नाहीत, जीव गमवावा लागतो, वर इव्हेंट करत आहेत, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.
पालकमंत्री फडणवीस आणि कॅबिनेट मंत्री आत्राम या दोघांनी या घटनेवर उत्तर द्यावेच लागेल. तसे अपेक्षित आहे. नाहीतर आहेच माफी, माफी मागायची मोकळं व्हायचं पापातून, जशी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर माफी मागितली. माफी मागितल्यानंतर काय, पण लोकांचा जीव जातोय, यांचं उत्तर अपेक्षित आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.
लाडकी बहीण योजनेत होत असलेल्या कार्यक्रमावर देखील विजय वडेट्टीवार संतापले. ते म्हणाले, ‘महायुती सरकारचे इव्हेंट सुरू आहेत. लाडकी बहीण योजनेत कार्यक्रम सुरू आहेत. १०० फुटांचे रॅम्प टाकले जातात. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री रॅम्पवर चालतात. फॅशन-शो आहे काय? महिलांचे कार्यक्रम घेताना, फॅशन-शो करायला निघालेत, इव्हेंट करायला निघालेत, तिजोरी साफ करायला निघालेत, अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी महायुती भाजप सरकारला फटकारले.