सांगली : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग रद्दच्या प्रमुख मागणीसाठी दि. २३ मार्च रोजी शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या शहीद दिनी शहिदांना अभिवादन करून शक्तिपीठ महामार्ग बाधित क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगवा झेंडा फडकवत ठेवणार आहे. तसेच शेतक-यांचा विरोध असतानाही शक्तिपीठ महामार्ग लादला जात आहे.
शेतक-यांना उद्धवस्त करणा-या शासनाच्या धोरणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याला शेतकरी फाशी देणार आहेत, असा इशाराही शेकापचे जिल्हाध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी दिला. शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतक-यांची कवलापूर येथे बैठक झाली. या बैठकीनंतर दिगंबर कांबळे बोलत होते. कांबळे म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समितीने गेली वर्षभर अनेक आंदोलने केली आहेत.
शासन दरबारी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी केली आहे. शासनाने शेतक-यांची थट्टा करण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी पूर्वी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात येणार आहे अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.
सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्ग करणारच म्हणून चंग बांधला आहे. त्यामुळे आता जे काही आंदोलन करायचं ते शेतातच करायचे असा निर्धार शेतक-यांनी केला आहे. रविवार, दि. २३ मार्च रोजी शासन विरोधी जोरदार घोषणा देऊन अतितीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगवा झेंडा लढण्याची ऊर्जा देते. जोपर्यंत शक्तिपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत भगवा झेंडा शेतामध्येच फडकत राहणार आहे. जबरदस्तीने संयुक्त मोजणी करण्याचा शासनाकडून प्रयत्न झाल्यास शेतक-यांच्या प्रचंड मोठ्या रोषाला शासनाला सामोरे जावे लागेल.
यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे राज्य संपर्क प्रमुख शरद पवार, जिल्हाध्यक्ष घनश्याम नलावडे, उपाध्यक्ष राहुल जमदाडे, कार्याध्यक्ष भूषण गुरव, कोषाध्यक्ष विष्णू सावंत, हणमंत सावंत, बाळासाहेब लांडगे, ज्येष्ठ नेते गजानन पाटील, गजानन सावंत, शिवाजी शिंदे, नाथा माळी, जनार्दन सावंत, नागेश कोरे, वामन कदम, रत्नाकर वठारे, बाजीराव जाधव, सिद्धेश्वर जमदाडे व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाधित सर्वच जिल्ह्यांत आंदोलन
शक्तिपीठ महामार्ग बाधीत राज्यातील सर्वच जिल्ह्यांत आणि सांगली जिल्ह्यातील १९ गावांतील सर्व बाधित शेतक-यांनी आपल्या शेतात भगवा झेंडा लावून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहनही शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी केले आहे.