चंदीगड : पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी वैयक्तिक कारणावरून राजीनामा दिला आहे. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून राजीनामा सादर केला. बनवारीलाल पुरोहित यांनी आपल्या पत्रात मी वैयक्तिक कारणांमुळे आणि इतर काही वचनबद्धतेमुळे राजीनामा देत आहे. कृपया तो स्वीकारा, असे म्हटले. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी शुक्रवारी राष्ट्रपती आणि गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली होती. पंजाबचे राज्यपाल असताना बनवारीलाल पुरोहित यांची कारकिर्द मोठी वादग्रस्त होती. सुप्रीम कोर्टानेदेखील त्यांच्यावर ताशेरे ओढले. त्यांनी घेतलेले अनेक निर्णयदेखील बेकायदेशीर होते.
पंजाब राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आणि मान सरकार असा संघर्ष पंजाबमध्ये सुरु होता. हा संघर्ष सुप्रीम कोर्टातदेखील गेला. बनवारीलाल पुरोहित यांचे पंजाबच्या भगवंत मान सरकारशी अनेक मुद्द्यांवरून वाद होते. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा प्रलंबित बिले मंजूर होण्यास होत असलेल्या विलंबाबाबत होता. १० नोव्हेंबर २०२३ रोजी सुप्रीम कोर्टाने राज्यपाल पुरोहित यांना पंजाब विधानसभेने मंजूर केलेली ५ विधेयके मंजूर करण्यात विलंब झाल्याबद्दल कठोर निर्देश दिले होते. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू झाली होती.