22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रविदर्भ, कोकणात दाणादाण

विदर्भ, कोकणात दाणादाण

सर्वत्र धुवॉंधार, नद्यांना पूर, अनेक गावे, बाजारपेठा, पिके पाण्याखाली, शेतीचे मोठे नुकसान, जनजीवन विस्कळीत

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील ब-याच भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसाचा सर्वाधिक जोर मुंबई, मुंबई उपनगर कोकणासह विदर्भात असून, मुसळधार पावसाचा फटका स्थानिक नागरिकांसह शेतक-यांना बसला आहे. पुरामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवरून पाणी वाहात असून रस्त्यावरील वाहतूकही ठप्प झाली. तसेच शहरांतील रस्त्यांनाही नद्यांचे स्वरूप आले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पुरामुळे शेतशिवारातही पाणी शिरले असून, अनेक घरांतही पाणी घुसल्याने शेतपिकांचे आणि घरांचे, घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत.

विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून उपराजधानी नागपूरसह पूर्व विदर्भाला अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. धुव्वॉंधार पावसाने सर्वत्र दाणादाण उडाली आहे. अतिवृष्टीसदृश पावसामुळे पूर्व विदर्भातील जनजीवन विस्कळीत झाले असून शहरांतील रस्त्यांना नदी-नाल्याचे स्वरूप आले आहे. अजूनही काही भागांत पाऊस जोरदार कोसळत आहे. गडचिरोली जिल्ह्यात पार्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड तालुक्यातील १०० हून अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. भामरागडही अक्षरक्ष: जलमय झाले आहे. पुरामुळे ४ मुख्य महामार्ग आणि २६ छोटे मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.

गोसेखुर्द धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने नदीला पूर आला आहे. तसेच गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी आणि देवरी या तीन तालुक्यांना पावसाचा फटका बसला आहे. नदी, नाल्यांना पूर आल्याने अनेक घरांत पाणी शिरले आहे. यवतमाळ जिल्ह्यातही नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. कोसारा गावाजवळ वाहणा-या वर्धा नदीला पूर आला आहे. त्यामुळे कोसरा ते सोईट वाहतूक बंद करण्यात आली. तसेच वणी तालुक्यात आलेल्या पुरामुळे शेलू खुर्द मार्ग आणि शिवणी ते चिंचोली मार्ग बंद झाला. जिल्ह्यात २४ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून, १ हजार २१० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात तलाव फुटला
चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर-मूल मार्गावरील चिचपल्ली येथील गावतलाव फुटल्याने गावातील अंदाजे १०० ते १५० घरांत पाणी शिरले आहे. त्यामुळे घरातील धान्यासह संसारोपयोगी साहित्य, शेतीसाठी घरात आणून ठेवलेले खत आणि बी-बियाणे पाण्यात भिजले. तसेच पुरात १०० बक-या आणि इतर जनावरे दगावली. त्यामुळे ग्रामस्थांची मोठी हानी झाली आहे. पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात शाळांना सुटी देण्यात आली.

मुंबईत जनजीवन विस्कळीत
मुंबई उपनगरांतही गेल्या २ दिवसांपासून पावसाचे पाणी साचले आहे. यामुळे मुंबईतील वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. मुंबई लोकलही काही मिनिटे उशिराने धावत आहेत. मुसळधार पावसामुळे दादर, परळमध्ये पाणी साचले आहे. वाडिया आणि के.ई.एम. रुग्णालय परिसरात एक ते दीड फुटापर्यंत पाणी साचले आहे. मुंबईत सर्वत्र अशीच स्थिती असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुसरीकडे समुद्रकिना-यापासून दूर राहण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. मुंबईत गेल्या ३ दिवसांत ३२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

कोकणात नद्यांना पूर, अनेक गावे पाण्यात
रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोकणातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून पुराचे पाणी आजूबाजूच्या गावांत शिरले आहे. खेडमधील जगबुडी नदीला पूर आला असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नारंगी नदीलाही पूर आल्याने खेड-दापोली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सध्या जगबुडी नदी ९ मीटर पातळीच्या खालून वाहत असली तरी पावसाचा जोर असल्याने खेड शहरावर पुराची टांगती तलवार आहे. चिपळूणमध्ये वाशिष्टी नदीलाही पूर आला आहे. वाशिष्टी आणि शिव नदी इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत.

रायगड जिल्ह्यातही रोहा येथील कुंडलिका नदी दुथडी भरून वाहात आहे. या नदीचा पूर इशारा पातळीच्या बाहेर गेल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही खेड आणि राजापूरची अर्जुना व कोदवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. काजळी नदीला पूर आल्याने रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई बाजारपेठेतल्या काही दुकानांत पाणी शिरले आहे. राजापूर, खेड, चिपळूण, संगमेश्वरमधील बाजारपेठाही पाण्याखाली गेले आहेत.

प्रशासनाला सतर्कतेचे आदेश
राज्यात ब-याच भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, राज्यातील सर्व महापालिका आयुक्त आणि आप्तकालीन यंत्रणांच्या प्रमुखांशी चर्चा करून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन, पोलिस, महापालिका, नगरपालिका आदी विविध स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सतर्क राहावे आणि नागरिकांना मदत करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR