धाराशिव : प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील वडगाव काटीच्या ग्रामसेवकाला पंचासमक्ष लाच मागितल्या व घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून ही कारवाई शुक्रवारी दि. २ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. सुभाष सिद्राम चौगुले (५४) असे लाच प्रकरणातील आरोपी ग्रामसेवकाचे नाव आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबीच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने वडगाव काटी ग्रामपंचायतीमध्ये घरकुलाचा प्रस्ताव दाखल केला होता. हा प्रस्ताव तुळजापूर पंचायत समिती कार्यालयात पाठविण्यासाठी ग्रामसेवक सुभाष सिद्राम चौगुले यांनी पाच हजार रूपयांची लाच तक्रारदाराकडे मागितली होती. त्यापैकी २ हजार रूपये ग्रामसेवकाने पंचासमक्ष यापुर्वीच स्विकारले होते. आणखी ३ हजार रुपये लाचेची मागणी करुन स्विकारण्याची तयारी दर्शविली होती. या प्रकरणी ग्रामसेवकाला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध पोलिस स्टेशन तुळजापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई एसीबीचे पोलिस निरिक्षक तथा सापळा अधिकारी नानासाहेब कदम यांनी सापळा पर्यवेक्षण अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक सिध्दराम म्हेत्रे, मार्गदर्शक पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलिस अधीक्षक मुकूंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली केली. सापळा पथकामध्ये पोलीस अंमलदार आशिष पाटील, सिद्धेश्वर तावसकर यांचा समावेश होता. लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खासगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर संपर्क साधण्याचे आवाहन एसीबी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.