27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रजरांगेंची उद्या जालन्यात भव्य सभा

जरांगेंची उद्या जालन्यात भव्य सभा

१४० एकर सभेसाठी, २० हजार दुचाकी रॅलीसाठी ; १३० जेसीबी फुलांच्या वर्षावासाठी

जालना : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्र दौरा होत असून, या दौ-यातील पहिली सभा जालना शहरात होणार आहे. जालन्यातील नवीन मोंढ्याजवळील पांजरापोळ मैदानावर उद्या (१ डिसेंबर) ही भव्य सभा होणार आहे. या सभेसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे. ज्यात सभेसाठी १४० एकरचे नियोजन करण्यात आले असून, २० हजार दुचाकीच्या माध्यामतून रॅली काढली जाणार आहे. सोबतच जरांगे यांच्या स्वागतासाठी १३० जेसीबीच्या माध्यमातून फुलांचा वर्षाव केला जाणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या १ डिसेंबर रोजी होणा-या सभेचे नियोजन करण्यात आले आहे. आवश्यक ती तयारी देखील आता अंतीम टप्प्यात आली आहे. चाळीस एकराच्या भव्य मैदानावर सभा होणार आहे, तर शंभर एकर जागेवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सभेची वेळ दुपारी २ वाजताची असली तरी सर्वांना सकाळी १० वाजताच येण्याची सूचना करण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

तसेच, मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची जय्यत तयारी देखील पूर्ण झाली आहे. त्यांच्या स्वागतासाठी शहरात ४० हजार चौरस फुटांचे होर्डीग्स आणि कटआऊट्स लावण्यात येणार असून सकल मराठा समाजाच्या बॅनर्सवर सर्व समाजातील थोर महापुरूषांचे फोटो लावण्यात येणार आहे. सभेत होणा-या गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांसोबतच सकल मराठा समाजाचे दहा हजार स्वंयसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर विविध जबाबदा-या देण्यात आल्या आहे. त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. जिल्हाभरातून तसेच अन्य ठिकाणावरून समाजबांधव मोठ्या संख्येने येण्याची शक्यता असल्याने त्यांच्यासाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

आरोप-प्रत्यारोप
मागील काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, हिंगोली येथील सभेतून भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांनी जरांगे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे उद्याच्या सभेत जरांगे कोणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

जरांगे आपली भूमिका मांडणार?
विशेष म्हणजे आंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणात ऋषिकेश बेदरेला अटक करण्यात आली असून, यावर देखील आपण सभेत स्पष्ट भूमिका मांडणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. त्यातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका आता बदलू नयेत असेही जरांगे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री यांच्याबद्दल देखील या सभेतून जरांगे आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR